आज चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४८ प्रारंभ पराभवनाम संवत्सर.
चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणजेच ‘गुढीपाडवा’ हा सण भारतीय वर्षाची सुरुवात असते. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेनुसार चैत्र हा प्रारंभीचा मास (महिना) आहे. हिंदू चंद्र – सौर दिनदर्शिकेनुसारही या महिन्यापासून वर्ष सुरू होत असल्याने चैत्रातील पहिली तिथी चैत्र शुल्क प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे.
आजचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असून यादिवशी कोणतेही कार्य सुरू करण्यास शुभ व फलदायी मानले जाते. हा दिवस संपूर्ण भारतभरात विशेष उत्साहात साजरा केला जातो. दक्षिणेत कर्नाटक, आंध्र प्रदेशात हा सण युगादी (युगाचा प्रारंभ) म्हणून साजरा केला जातो.
हिंदू परंपरा, संस्कृतीनुसार ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मांडाची निर्मिती केली असे मानले जाते त्यामुळेच सृष्टीचा आरंभबिंदू मानला जातो. गुढीपाडव्याचे महत्व
शालिवाहन राजाने शक व हूणांचा पराभव करून विजय मिळवला व त्याचे प्रतिक मानून या दिवशी घरोघरी विजयध्वज (गुढी) उभारण्याची परंपरा आहे.सम्राट विक्रमादित्य राजाने परकीय आक्रमकांचा पराभव करेन इसवी सन पूर्व ५७ मध्ये विक्रम संवत या नव्या कालगणनेचा प्रारंभ केला होता.
याच दिवसापासून चैत्र नवरात्री देखील सुरू होते तर सांगता चैत्र शुक्ल नवमीला होते. चैत्र शुक्ल नवमी तिथीला प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला होता. चैत्र महिन्यात पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते तर चैत्र महिन्यात मत्स्यवतार जयंती त्याच बरोबर महावीर जन्मकल्याणक (महावीर जयंती) देखील असते. या महिन्याच्या शुक्ल पक्षात भगवान विष्णूचा अवतार मानल्या जाणाऱ्या संत झुलेलाल यांची देखील जयंती असते. गुढीपाडव्याच्या दिवशी शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेली जगप्रसिद्ध स्वयंसेवी संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती असते.
शिशिरातील तीव्रपानगळी नंतर चैत्राची चाहूल लागताच निसर्ग देखील कात टाकून नवचैतन्याने बहरतो. चैत्र महिना भारतीय शेतीच्या दृष्टीने एका हंगामातून दुसऱ्या हंगामात जाण्याचा संक्रमण काळ मानला जातो. या दिवशी घराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधले जाते.
कडुनिंब आणि गुळाचे महत्व
चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंब आणि गुळाचा नैवेद्य देखील दाखवला जातो. उन्हाळ्याची सुरुवात झाल्यानंतर शरीराला आवश्यक असणारी रोगप्रतिकारक शक्ती या दोन्ही घटकातून मिळते. कडुनिंब हा नैसर्गिक अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल, अँटीवायरल, डिटॉक्सीफाईंग,प्रतिजैवक असल्याने शहरातील हानिकारक असणारे घटक बाहेर टाकतो. उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठीही कडुनिंब खाल्ला जातो. याच्या सेवनामुळे शरीर थंड राहते. उष्णतेमुळे होणारे फोड,चकत्या, मुरूम, पुरळ, खाज यापासून बचाव करतो तर गुळ शरीराला थंडावा प्रदान करतो. गुळ हा त्वचेसाठी चांगला असतो यामुळे त्वचा उजळ, तेजस्वी दिसते. गुळ कडुनिंब एकत्र खाल्यामुळे पचन सुधारते रक्तशुद्धी, आतड्यांची स्वच्छता होते. अनेकजण या दिवशी कडुनिंबाचा रस देखील पितात.
कडक उन्हाच्या झळा असताना देखील एकप्रकारे नवसृजनाचा उत्सव असलेला चैत्र महिना खऱ्या अर्थाने सर्वांगसुंदर असा आहे.
सर्व वाचक, हितचिंतकांना सिटीनामा न्यूज परिवारातर्फे संकल्पपूर्तीसाठी नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
– संपादक, सिटीनामा न्यूज
