भक्तिगीतांच्या सादरीकरणाने श्रोत्यांसह वातावरण स्वामीमय

Share this News

चिंचवड / पुणे दि.२० मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)

चिंचवड भागातील श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवातील तृतीय पुष्प पंडित योगेश तपस्वी आणि सहकारी यांनी सांगीतिक मैफलीच्या माध्यमातून गुंफले.येथील प्रांगणात श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पंडित योगेश तपस्वी आणि सहकारी यांनी सादर केलेल्या श्री स्वामी समर्थ आणि मांदियाळीतील सत्पुरुषांवरील भक्तिगीतांनी श्रोते स्वामीमय झाल्याची अनुभूती श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, बुकॉऊ वुल्फ कॉलनी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे सर्व उपस्थितांना आली. याप्रसंगी नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगरसेवक मधू जोशी, श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे – पाटील, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे, खजिनदार गणपती फुलारी, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे – पाटील, हेमा दिवाकर, माधव कुलकर्णी, मंडळाचे विधी सल्लागार ॲड. संदीप बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मैफलीचा प्रारंभ श्री स्वामी समर्थ आणि मांदियाळीतील सत्पुरुषांच्या सांगीतिक नामजागराने करण्यात आला. ‘स्वामी या हो…’ या प्रार्थनेने वातावरण भक्तिमय झाले; तर ‘स्वामी सद्गुरुनाथा माझे आई…’ , ‘सुंदर ते ध्यान वटवृक्षातळी…’ या भक्तिरचनांनी भक्तिरंग अधिकच गहिरा झाला. ‘भक्तजनों के साथ तुम्हारा भरा दरबार रे…’ या कव्वालीला श्रोत्यांनी दाद दिली. ‘माझा स्वामी जगजेठी कसा दिसे?…’ , ‘भाव जाणुनी मज अंतरीचा…’ या गीतांना टाळ्यांच्या रूपाने पसंतीची पावती मिळाली. ‘स्वामी राजे त्रिभुवनाचे…’ , ‘स्वामी तव चरणाचे दर्शन…’ या मराठी भक्तिगीतांसोबतच ‘तेरा नाम गाऊ निसदिन…’ , ‘स्वामी मंदिर चलो…’या हिंदी रचनांनाही श्रोत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. सामुदायिक तारकमंत्रानंतर ‘हम गया नही जिंदा हैं…’ या लोकप्रिय सूफी कव्वालीने मैफलीची सांगता करण्यात आली. गीतांचे सादरीकरण करताना योगेश तपस्वी यांनी अधूनमधून केलेल्या मार्मिक टिप्पणीमुळे मैफल अधिकच रंगतदार झाली. उदय शहापूरकर (हार्मोनियम), पद्माकर गुजर (तबला), दिलीप व्यास (पखवाज) आणि विनोद तपस्वी, जयदीप मराठे, अतुल बांदल, अशोक ससाणे (तालवाद्य आणि गायनसाथ) यांनी नेटकी साथसंगत केली.

कार्यक्रमादरम्यान श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाच्या वतीने एक तपापासून गोसेवा करणारे तसेच सुमारे दोनशे गायींचे संगोपन करणारे मोहन गुपचूप यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी बबन दगडे – पाटील यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

प्रकटदिन उत्सवात पहाटे ४:३० वाजता श्रींचा फळांच्या रसाने अभिषेक आणि पूजा, श्रींची आरती, स्वामी स्वाहाकार आणि पूर्णाहुती, महानैवेद्य, माध्यान्ह आणि सायंकालीन आरती, भजनसेवा इत्यादी धार्मिक विधी संपन्न झाले. कैलास भैरट यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *