संघटित हिंदू हेच भारताचे सामर्थ्य – ह.भ.प.सूर्यवंशी महाराज

Share this News

पुनावळे/पुणे  दि.२१ मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)
जातीपाती विरहित संघटित हिंदू समाज काळाची गरज असून संघटित हिंदू हेच बलशाली भारताचे सामर्थ्य आहे असे प्रतिपादन ह.भ.प.महावीर महाराज सूर्यवंशी महाराज यांनी केले ते पांढरे वस्ती, पुनावळे येथे सकल हिंदू समाज आयोजित विराट हिंदू संमेलनात बोलत होते.
व्यासपीठावर सूर्यवंशी महाराज,बाळासाहेब पांढरे, प्रमुख वक्ते जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुकुंदराव कुलकर्णी, भारतीय स्त्री शक्तीच्या सामाजिक कार्यकर्त्या शिल्पाताई बिबिकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.

कुटुंबव्यवस्था भारताची ताकद

प्रमुख वक्ते मुकुंदराव कुलकर्णी यांनी सकल हिंदू समाजाच्या ऐक्यावर भर दिला. आपली गौरवशाली कुटुंब व्यवस्था ही राष्ट्राची ताकद असून आपली कुटुंब व्यवस्था टिकवण्याची प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष असून या निमित्याने समाज परिवर्तनासाठी स्वदेशी, जाती पाती विरहित हिंदू समाज, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, नागरी कर्तव्ये हे बिंदू आचरणात आणण्याचे आवाहनही केले. शिल्पाताई बिबिकर यांनी भारतीय संस्कृतीने स्त्रियांना महत्वपूर्ण स्थान दिले असून स्त्रियांनी आपला धर्म, संस्कृती परंपरा टिकविण्यासाठी जागृत राहण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब पांढरे यांनी पुनावळे ग्रामस्थांच्या वतीने या हिंदू संमेलनाची आवश्यकता विषद करून सकल हिंदूंनी एकत्रित राहण्याचे आवाहन केले.

सुरुवातीला नववर्ष स्वागत समितीच्या वतीने परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या यात्रेत कलश यात्रा, प्रभू रामाची पालखी आणि पारंपरिक वेशभूषेतील लहान मुले पूर्णवेळ आकर्षणाचे केंद्र होती. एका लहान मुलीने ‘वासुदेव’ वेशभूषेतून केलेले सामाजिक प्रबोधन उपस्थितांची दाद मिळवून गेले. पारंपरिक वेशभूषेतील सर्व बालगोपालांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.

या संमेलनाला या भागाच्या नगरसेविका सौ. रेश्माताई चेतन भुजबळ, सौ. श्रुतीताई राम वाकडकर, राहुल कलाटे यांचेसह कीर्ती ठाकरे, मनोहर काटे, प्रधान काटे, गणेश पांढरे, मल्हार म्हसुदगे यांच्यासह गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी ‘सांस्कृतिक वार्तापत्र’ विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, तसेच पुस्तक व साहित्य विक्रीचा स्टॉलही याठिकाणी लावण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विता सोनगीरे यांनी, तर आभार प्रदर्शन शैलेश पाचपुते यांनी मानले. लक्ष्मण कुलकर्णी यांनी ‘शिववंदना’ म्हटली आणि त्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *