पुणे, दि. २५ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)
नीट परीक्षेतील कथित अन्यायाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या दीपकेंनी त्यांच्या आंदोलनातून मोठे यश मिळविल्याचे त्यांना वाटत असेल, तर आता देशातील गुणवंत आणि मेहनती विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्नही त्यांनी तितक्याच गांभीर्याने घ्यावा, असे आवाहन समस्त ब्राह्मण संघाचे डॉ. सचिन शशिकांत बोधनी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
नीट परीक्षेत चांगले गुण मिळवूनही अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणात प्रवेश मिळत नाही. दुसरीकडे, आरक्षणाच्या व्यवस्थेमुळे तुलनेने कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. त्यामुळे ५००, ५५०, ६०० किंवा त्याहून अधिक गुण मिळविणारे, क्षमता आणि गुणवत्ता असलेले अनेक विद्यार्थी डॉक्टर होण्याच्या संधीपासून वंचित राहतात, अशी खंत डॉ. बोधनी यांनी व्यक्त केली.
“जर एका विशिष्ट अन्यायाविरुद्ध आंदोलन करून त्यात यश मिळविले असेल, तर आता गुणवत्तेवर अन्याय करणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेविरुद्धही आवाज उठविण्याचे धैर्य दाखवणार का?” असा थेट सवाल डॉ. बोधनी यांनी केला.
हा प्रश्न केवळ वैद्यकीय प्रवेशापुरता मर्यादित नाही. शासकीय नोकरभरती, उच्च शिक्षणातील प्रवेश आणि विविध क्षेत्रांमध्ये गुणवत्तेपेक्षा इतर निकषांना प्राधान्य दिल्यामुळे अनेक गुणवंत युवक-युवतींच्या संधी हिरावल्या जात आहेत. अनेक वर्षे कठोर परिश्रम करून उच्च गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेच्या आधारे समान संधी मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे.
“एका विद्यार्थ्याने ५०० ते ६०० गुण मिळवूनही केवळ आरक्षणाच्या व्यवस्थेमुळे वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहावे आणि त्याच्यापेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळावा, ही व्यवस्था गुणवत्तेच्या दृष्टीने कितपत न्याय्य आहे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे,” असे डॉ. बोधनी यांनी म्हटले.
देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी, गुणवत्तेला योग्य स्थान आणि पारदर्शक व्यवस्था मिळावी, यासाठी व्यापक राष्ट्रीय चर्चा होणे आवश्यक आहे. केवळ एका परीक्षेतील कथित गैरप्रकाराविरुद्ध लढा देणे पुरेसे नाही; तर शिक्षण आणि रोजगार क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या संधींवर परिणाम करणाऱ्या सर्व व्यवस्थात्मक प्रश्नांवरही आवाज उठविणे गरजेचे आहे.
“जर खरोखरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता असेल, तर गुणवंत विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि गुणवत्तेवर आधारित समान संधीसाठीही आंदोलन करणार का?” असा सवाल समस्त ब्राह्मण संघाच्या वतीने डॉ. सचिन शशिकांत बोधनी यांनी केला आहे.
– डॉ. सचिन शशिकांत बोधनी
समस्त ब्राह्मण संघ
