‘भरतमुनि रंगघन’ समीप रंगमंच रसिकांच्या सेवेत

Share this News

-पिंपरी चिंचवडला मिळाला नवा प्रायोगिक रंगमंच; रंगकर्मींनी केले स्वागत

निगडी / पुणे दि.२१ (सिटीनामा वृत्तसेवा)
भरतमुनी रंगघन या समीप रंगमंचाच्या निमित्याने पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रायोगिक रंगभूमीला नवे व्यासपीठ मिळाले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर सौ.शर्मिलाताई बाबर आणि ज्येष्ठ रंगकर्मी तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मध्यवर्ती शाखा) उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते नाटकाची पारंपरिक तिसरी घंटा देत ‘भरतमुनि रंगघन’ या समीप रंगमंचाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. यावेळी ज्येष्ठ सिनेमा दिग्दर्शक मिलिंद लेले, नाट्य-चित्रपट निर्माते प्रद्योत पेंढारकर, नगरसेवक शेखर चिंचवडे तसेच खास विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध असलेले सिने-अभिनेता पुष्कराज चिरपुटकर, लेखक सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पेंडसे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.

यावेळी बोलतांना ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक व मीती फिल्म सोसायटी अध्यक्ष मिलिंद लेले  यांनी अशा प्रायोगिक समीप रंगमंचाची आवश्यकता प्रत्येक रंगकर्मीसाठी महत्वाची असून या माध्यमातून कलाकारांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. टीम रंगविभोर ने सर्व कलाकारांसाठी भरतमुनी रंगघन च्या माध्यमातून मोठे पाऊल उचलले असून यामुळे पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे.
पिंपरी चिंचवड मध्ये अशा प्रकारचा रंगमंच पहिल्यांदाच साकार होत असून १८०,३६० डिग्री मध्ये रसिक प्रेक्षक कला सादरीकरणाचा आनंद घेऊ शकणार आहेत.भाऊसाहेब भोईर यांनी  रंगविभोर च्या सर्व चमूचे अभिनंदन करीत जास्तीत जास्त नाट्यरसिकांनी या नव्या प्रयोगाला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. कलाकारांनी भरतमुनी रंगघन
शहरातील कलाकारांना प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाट्य, नृत्याविष्कार आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक सक्षम, सुसज्ज आणि माफक दरात उपलब्ध होणारे व्यासपीठ म्हणून ‘भरतमुनि रंगघन’ उभे राहिले आहे. या उपक्रमामुळे स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी नवे दालन खुलले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

उद्घाटनानिमित्त ‘रंगविभोर’ प्रस्तुत “अमृतपुत्र” हा नाट्य, नृत्य आणि गायनाचा संगम असलेला बहुआयामी कार्यक्रम सादर करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार विजेते माधव जोगळेकर यांच्या लेखन व दिग्दर्शनाखाली सादर झालेल्या या कार्यक्रमाने रसिकांना खिळवून ठेवले.

या कार्यक्रमात गायनासाठी मंदार ढुमणे, अनिरुद्ध सराफ, वैभव केसकर, सागर चव्हाण, पियुष कुलकर्णी, वैभव वस्ते, स्वरेशा कुलकर्णी, स्नेहल कोकीळ, कोमल देशमुख, मानसी कोटेवार यांनी सहभाग घेतला. नृत्याविष्कारासाठी सायली काणे, पद्मिनी सोनावणे आणि कलाश्री नृत्यशाळेच्या नृत्यांगनांनी सादरीकरण केले. तर नाट्य विभागात पिंपरी चिंचवडचे सुप्रसिद्ध कलाकार संकेत लोंढे, ज्योती आपटे, वेदिका वाबळे, अमानत शेख आणि डॉ. संजीवकुमार पाटील यांनी आपली कलाकृती सादर केली. मिलिंद बावा आणि रुपाली पाथरे ह्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन केले.


‘भरतमुनि रंगघन’ येथे दिग्दर्शकांना 360° किंवा 180° अशा Multidimensional stage स्वरूपातील प्रयोग करण्याची संधी उपलब्ध होणार असून, या संकल्पनेचे विशेष कौतुक करण्यात आले. ‘भरतमुनि रंगघन’ हा राजवारसा रेंटलचे सचिन काळभोर, अभिनेता दिग्दर्शक लेखक डॉ. सुचेत गवई, कला दिग्दर्शक संकेत पाटील आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते माधव जोगळेकर यांच्या कल्पनेतून आणि अथक परिश्रमातून साकार झाला असून, या उपक्रमाबद्दल मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

प्रायोगिक रंगभूमीसाठी महाराष्ट्रातील इतर पालिकांची उदासीनता हा विषय चर्चिला जात असताना, या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर एक सकारात्मक पाऊल म्हणून ‘भरतमुनि रंगघन’चा समीप रंगमंच हा सक्षम पर्याय पुढे येत आहे. कलाकार, दिग्दर्शक आणि रंगकर्मी यांना प्रायोगिक नाट्य प्रयोगांसाठी आवश्यक असलेले जवळचे, सजीव व्यासपीठ येथे उपलब्ध होणार आहे. तसेच फिल्म स्क्रिनिंग, एकांकिका स्पर्धा, फिल्म फेस्टिव्हल, संगीत, नृत्य अशा विविध कलाविष्कारांसाठीही हे ठिकाण उत्तम पर्याय ठरू शकते. तसेच तालीम, आर्ट गॅलरी यासाठी देखील. 

प्रेक्षक आणि कलाकार यांच्यातील थेट संवाद साधणारी ही जागा प्रायोगिक नाट्यचळवळीला नवी ऊर्जा देणारी ठरणार असल्याचे मानले जात आहे. मोठ्या नाट्यगृहांच्या मर्यादा ओलांडत सर्जनशीलतेला मुक्त वाव देण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न असल्याचे मत व्यक्त होत आहे. शंभर प्रेषक क्षमता असलेले “भरतमुनि रंगघन” रंगमंच म्हणून नव्हे, तर नव्या कल्पनांना आकार देणारे एक सशक्त सांस्कृतिक केंद्र म्हणून पाहिले जात आहे.

पिंपरी-चिंचवडच्या प्रायोगिक रंगभूमीला हवी असलेली हीच जागा आता प्रत्यक्षात साकार झाल्याची भावना रंगकर्मींकडून व्यक्त करण्यात आली.

नाट्य व सिनेविश्वात करिअर करण्यास उत्सुक असलेल्या युवकांसाठी एप्रिल-मे महिन्यातील प्रत्येक शनिवार व रविवार अशा एकूण आठ दिवसांची नाट्यकार्यशाळा १५ एप्रिलपासून ‘रंगविभोर’ तर्फे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत नाट्यसृष्टीतील मान्यवरांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच ‘मिर्झा’ या रंगभूमीवर येणाऱ्या नव्या दीर्घांकाच्या पोस्टरचेही अनावरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला शहरातील जेष्ठ, तरुण रंगकर्मी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *