चिंचवड / पुणे दि.२० मार्च (सिटीनामा वृत्तसेवा )
‘धर्मासाठी अनन्वित अत्याचार सोसून आपल्या प्राणांचे बलिदान देत धर्मवीर शंभुराजे यांनी धर्माभिमान शिकवला आणि तो जपणे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध युवा व्याख्याते आशुतोष झा यांनी गुरुवार दि. १९ मार्च २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, बुकॉऊ वुल्फ कॉलनी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे केले. श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळ आयोजित पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवात ‘शिवशंभो गाथा’ या ऐतिहासिक विषयावरील चतुर्थ पुष्प गुंफताना आशुतोष झा बोलत होते. माजी नगरसेवक मधू जोशी, मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे – पाटील, उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधवडे, सहसचिव मीनल देशपांडे, खजिनदार गणपती फुलारी, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे – पाटील, हेमा दिवाकर, माधव कुलकर्णी, नीलेश मरळ यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
अभिनिवेशपूर्ण शैलीतून विषयाची मांडणी करताना आशुतोष झा पुढे म्हणाले की, ‘आपण सारे सनातनी आहोत. काल, आज आणि उद्याही सनातन धर्म अस्तित्वात राहणार आहे. प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे प्रतीक आहे, हे आम्हाला छत्रपती शिवाजीमहाराज यांनी शिकवले. बहुभाषाकोविद, झुंजार लढवय्या असे छत्रपती संभाजीमहाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते; परंतु शत्रुबोध नसल्याने आपल्याच माणसांनी शंभुराजे यांचा घात केला. धर्मासाठी शंभुराजे यांनी केलेले बलिदान भावी पिढीपर्यंत आपणच पोहोचवले पाहिजे!’ अतिशय भावोत्कट शब्दांतून झा यांनी शंभुराजे यांच्या बलिदानाचा इतिहास साकार करीत उपस्थितांना हेलावून टाकले.
कार्यक्रमापूर्वी, श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाच्या वतीने अनुजा उचगावकर आणि दिगंबर उचगावकर या दांपत्याला सुमारे तेवीस वर्षांपासून योगसाधनेच्या प्रचार अन् प्रसार कार्यासाठी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
प्रकटदिन उत्सवात पहाटे ४:३० वाजता श्रींचा सुगंधी द्रव्याने अभिषेक आणि पूजा, श्रींची आरती, स्वामी स्वाहाकार आणि पूर्णाहुती, महानैवेद्य, माध्यान्ह आणि सायंकालीन आरती, भजनसेवा इत्यादी धार्मिक विधी संपन्न झाले. कैलास भैरट यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
