पुणे दि.१६ मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)
प्रचंड चर्चेत राहिलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीचा निकाल अखेर रविवारी (दि.१५ मार्च २०२६ ) रात्री साडेनऊच्या सुमारास जाहीर झाला आणि या निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीने घवघवीत यश मिळवित त्यांनी अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष या तिन्ही प्रमुख पदांसह काही कार्यवाह पदेही जिंकली आहेत.महाराष्ट्र साहित्य परिषद या महत्वपूर्ण संस्थेत तब्बल १० वर्षांनी सत्तापालट झाला आहे. प्रमुख पदांसाठी विद्यमान पदाधिकारी असलेल्या परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा मोठा पराभव झाला आहे.
अध्यक्षपदासाठी – साहित्य संवर्धन आघाडीचे योगेश सोमण (मते ५३६५) विरुद्ध परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे प्रा. मिलिंद जोशी (मते ५३२०) यामध्ये योगेश सोमण यांनी बाजी मारली असून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
प्रमुख कार्यवाह पदासाठी – साहित्य संवर्धन आघाडीच्या स्वाती महाळंक (मते ५४१४) विजयी विरुद्ध सुनीताराजे पवार (मते ५२८५)
कोषाध्यक्षपदासाठी साहित्य संवर्धनआघाडीचे- प्रदीप निफाडकर (मते ५५३६) विजयी विरुद्ध विनोद कुलकर्णी (मते ५१६८)
तर पुण्यातील सात स्थानिक कार्यवाह पदासाठी संमिश्र निकाल लागले असून यात परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे ३ तर साहित्य संवर्धन आघाडीचे चार उमेदवार निवडून आले असल्याची माहिती आहे.
निवडणुकीसाठी ॲड. प्रताप परदेशी यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून, तसेच संजीव खडके व गिरीश केमकर यांनी सह निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीच्या वेळी अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. विशेषतः विद्यमान परिवर्तन उत्कर्ष आघाडी करीत असलेला एकतर्फी कारभार याविषयी साहित्य संवर्धन आघाडीने जोरदार रान उठवले होते.विद्यमान तसेच विरोधी दोन्ही कडून पत्रकार परिषदा घेऊन आपली बाजू मांडण्यात आली होती मात्र सभासद मतदारांनी शेवटी प्रमुख पदांसाठी साहित्य संवर्धन आघाडीला कौल दिला आहे. साहित्य संवर्धन आघाडीला भाजपा, संघ परिवाराचा पाठिंबा होता.
साहित्य संवर्धन आघाडी ही समविचारी साहित्यप्रेमी आणि वाचककेंद्रित अशी आघाडी होती. निवडणुकीत आमचे उमेदवार बहुमताने विजयी झाले, याचा आनंद आहे. आमच्या आघाडीसाठी काम केलेल्या सर्वांचा हा विजय आहे. त्यांना हा विजय समर्पित करतो. यापुढे मसापमध्ये कायद्याप्रमाणे, नियमानुसारच कारभार होईल.
-योगेश सोमण, (मसापचे नवनिर्वाचित अध्यक्ष)
