मोशी दि.१५ (सिटीनामा वृत्तसेवा)
नव्या पिढीला आपल्या महनीय हिंदू धर्म संस्कृतीविषयी माहिती होणे गरजेचे असून त्यांनी आपले संत, आध्यात्मिक सत्पुरुष यांचे कार्य अभ्यासून सामाजिक जाणीव लक्षात घेऊन आपल्या हिंदू धर्म, संस्कृती संवर्धनासाठी, जोपासण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज ह. भ. प.अनिकेत महाराज मोरे यांनी केले ते मोशी येथे लक्ष्मी चौक चिखली मोशी रोड दक्षिणमुखी हनुमान मंदिर व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मैदानावर आयोजित भव्य हिंदू संमेलनात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर हिंदू संमेलनाचे अध्यक्ष संतोष बारणे, ऍड.सौ.निधी शर्मा, मिलिंद वाईकर, नारायण देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री नागेश्वर महाराज, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मोशी भागातील रिव्हर व स्वराज वस्तीतील सकल हिंदू समाजाने या संमेलनाचे आयोजन केले होते.
या ऐतिहासिक हिंदू संमेलनात नागरिक, मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष बारणे यांनी हिंदू विचारांचे संमेलन व एकत्रीकरण काळाची गरज असल्याचे सांगून असे एकत्रीकरण कायम होत राहण्याची अपेक्षा व्यक्त केली.
पुढे बोलतांना ह. भ. प.मोरे महाराज यांनी युवकांना अध्यात्माकडे आकृष्ट करण्यासाठी विविध प्रकल्प, ऑनलाईन वारी, ऑनलाईन हरिपाठ, गुरुकुलम आदी उपक्रम सुरू केल्याचे सांगून भारताबाहेरील लंडन मध्ये देखील ज्ञानेश्वरी पारायण करून भागवत धर्माची पताका अखंड विश्वात फडकत ठेवण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले.
धर्मांतर विरोधी कटकारस्थानाला हिंदू धर्मातील महिला, मुलींनी बळी न पडता आपल्या धर्माचा स्वाभिमान कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या धर्म संस्कृतीचे कार्य करणारे सर्व संत हे तरुणांनी आपले आदर्श ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. सौ. एम निधी शर्मा यांनी आपल्या भारतीय संस्कृती मध्ये महिलांचे उच्च स्थान असल्याचे सांगून लक्ष्मी नारायण रुपातील आपल्या आई वडिलांची सेवा करावी, आपला महान इतिहास समजून घेऊन आपली संस्कृती जपण्याचे आवाहन केले.

नारायण देशपांडे यांनी आपल्या भारतीय कुटुंब व्यवस्थेचे महत्व अधोरेखित करून पर्यावरणाविषयी सजग राहण्याचे आवाहन केले. मिलिंद वाईकर यांनी जातपात विसरून समस्त हिंदू एकत्रीकरण, हिंदूची जागरूकता महत्त्वाची असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश फडणीस, महेश पत्की ह्यांनी केले तर कार्यक्रम यशस्वितेसाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मोशी, परिसरातील विविध संस्था संघटना कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.
