ग्रंथोत्सवचे थाटात उद्घाटन; प्रा.डॉ गायकवाड यांची उपस्थिती

Share this News

पिंपरी/ पुणे दि.१५ मार्च (सिटीनामा वृत्तसेवा )
लेखणीत जग आणि जीवन बदलण्याची ताकद असते. जगातील अनेक क्रांती लेखणीमुळेच घडल्या आहेत!’ असे विचार कोल्हापूरस्थित ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. शरद गायकवाड यांनी आर्य समाज पुस्तकालय व मोफत वाचनालय, पिंपरी काॅलनी येथे शनिवार, दिनांक १४ मार्च २०२६ रोजी व्यक्त केले.

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सव २०२५च्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. शरद गायकवाड बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, पुणे प्रमुख कार्यवाह सोपान पवार, शासकीय विभागीय ग्रंथालय, पुणे ग्रंथपाल सुरेश रिद्दीवाडे, पुणे जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष मोहन शिंदे, पुणे विभाग ग्रंथालय संघ कार्यवाह राजेंद्र ढमाले, कोषाध्यक्ष रमेश सुतार, आर्य समाज प्रधान सुरेंद्र करमचंदानी आणि पुणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच पुणे जिल्ह्यातील विविध ग्रंथालयांचे ग्रंथपाल आणि कर्मचारीवर्ग यांची सभागृहात मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

यावेळी श्रीकांत चौगुले यांनी, ‘विद्यार्थ्यांवर मराठी साहित्याचे संस्कार झाले पाहिजेत!’ असे मत व्यक्त केले. सोपान पवार यांनी, ‘ग्रंथालयांची अवस्था सध्या बिकट असली तरी शासनाच्या साहाय्याने ती सक्षम होतील!’ अशा विश्वास व्यक्त केला. सुरेश रिद्दीवाडे यांनी, ‘वाचनसंस्कृतीचा विकास होण्यासाठी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांना प्राधान्य दिले पाहिजे!’ अशी अपेक्षा व्यक्त केली. रमेश सुतार यांनी संतांनी माय मराठी टिकवली, असे मत मांडले.

दीपप्रज्वलन आणि भारतीय ग्रंथशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन सत्राचा प्रारंभ करण्यात आला. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रगीत, आर्य समाज विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वागतगीत, जयहिंद विद्यालयातील बालशाहीर तनिष्क मगर आणि सहकारी यांनी सादर केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा; तसेच ह. भ. प. दादा मोरे, ह. भ. प. संगीता भालेराव आणि सहकारी यांनी गायन केलेले “ग्रंथ हाती, ग्रंथ आमुचे साथी” हे ग्रंथगीत यामुळे उद्घाटन सत्राला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली. श्रेया गोखले यांनी प्रास्ताविकातून, ‘वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी हे ग्रंथोत्सवाचे उद्दिष्ट असून ग्रंथपाल हा वाचन चळवळीचा दीपस्तंभ आहे; तर वाचक हा चळवळीचा प्राण आहे’ अशी भूमिका मांडली. याप्रसंगी मासिक ‘मातृरक्षा’ आणि साप्ताहिक ‘स्पर्धा वार्ता’ या अंकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले; तसेच ज्येष्ठ ग्रंथप्रेमी धोंडिबा सुतार यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. उद्घाटन सत्रापूर्वी, मान्यवरांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे अनावरण करण्यात आले. पूजा दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत सांगेपाग यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *