नवी सांगवी / पुणे दि.२८ मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)
नव्या पिढीने आपल्या महान भारतीय संस्कृती मूल्ये परंपरा समजून घेऊन त्याची जाण ठेवणे गरजेचे आहे. सध्या मुलींनी अतिशय सावध होऊन हिंदू संस्कार आणि मूल्ये याचे भान राखून उज्वल भविष्याची वाटचाल करणे गरजचे असल्याचे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्या एड.ईशानीताई जोशी यांनी मांडले त्या श्री महालक्ष्मी मंदिर नवी सांगवी येथे सकल हिंदू समाज, मातृशक्ती सांगवी आयोजित भव्य महालक्ष्मी महाआरती व हिंदू संमेलनात बोलत होत्या.

२६ मार्च रोजी नवी सांगवी येथील महालक्ष्मी सेवाभावी ट्रस्ट, सकल हिंदू समाज आयोजित हिंदू नववर्षाच्या निमित्याने १००१ महिलांच्या हस्ते श्री महालक्ष्मी मातेची महाआरती उत्साहात संपन्न झाली. यावेळी परिसरातील मातृशक्ती प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होती. पुढे बोलतांना ईशानी जोशी यांनी सध्या हिंदू महिला,मुलींच्या समोर लव जिहाद सारखे मोठे आव्हान असल्याचे सांगून घाबरून न जाता आपली संस्कृती, मूल्ये हेच आपल्याला वेळोवेळी योग्य दिशादर्शन करतात त्यामुळे मुलींनो आपला धर्म, संस्कृती, मूल्ये कधीही न विसरता उज्वल भविष्याची वाटचाल केली पाहिजे असे सांगितले.सामान्य महिलांना देखील महिलांविषयक मूलभूत कायदे माहिती असायला हवे असेही सांगितले. अध्यक्षीय भाषणात सौ. पूनमताई जाचक यांनी सकल हिंदू समाज एकत्रीकरणाची गरज विषद करून महिलांनी आपल्या आरोग्यासह, मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी सौ.रोहिणी पाटील, सौ.नंदा अहिरे,सौ. उमा अहिरे यांचेसह अनेकविध मान्यवर लोकप्रतिनिधी, अग्निहोत्र ग्रूपच्या महिला सभासद उपस्थित होते यावेळी मर्दानी आखाडा खेळाचे सादरीकरण झाले. सूत्रसंचालन एड. सौ.स्वाती कुलकर्णी तर आभार प्रदर्शन सौ.संगीता चव्हाण यांनी केले.

