पुणे दि.२८ मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)
रामनवमीच्या पर्वावर सी एस आर उपक्रमांतर्गत डब्लू टी इ इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. च्या. CSR (कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व) उपक्रमांतर्गत २५ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे ज्ञानप्रबोधिनी यांना हस्तांतरण करण्यात आले. सध्याच्या ऊर्जा गरजांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, स्वच्छ व पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मितीस चालना देणार आहे.

या प्रसंगी डॉ.मनोज देवळेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, देशासाठी अशा प्रकारचे प्रकल्प अत्यंत आवश्यक आहेत. जागतिक स्तरावर निर्माण होणाऱ्या संकटांच्या पार्श्वभूमीवर अपारंपरिक ऊर्जेचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात उद्योजक बनताना अशा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले तसेच प्रसाद कुलकर्णी यांच्यासारखे उद्योजक होऊन समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा दिली.
आपल्या भाषणात प्रसाद कुलकर्णी यांनी “समाजाला परत देणे” ही आपली ठाम भूमिका असल्याचे सांगितले. समाज आणि राष्ट्राबद्दल आपली जबाबदारी ओळखून, शक्य त्या प्रत्येक प्रकारे समाजासाठी योगदान देत राहण्याचा आपला निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास डब्लू टी इ इन्फ्रा फाउंडेशनच्या संचालिका तृप्ती प्रसाद कुलकर्णी, सौर प्रकल्प उभारणीत मोलाची भूमिका बजावणारे भूषण पाटील, तसेच डब्लू टी इ इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. च्या मानव संसाधन व्यवस्थापक कावेरी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
हा सौर ऊर्जा प्रकल्प WTE च्या CSR उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेला असून, पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत आणि शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे सर्व उपस्थितांनी नमूद केले.
