श्रोत्यांच्या प्रतिसादात इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘गाता रहे मेरा दिल’

Share this News

चिंचवड दि.२७ मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)
‘गाता रहे मेरा दिल’ या इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत
नि:शुल्क ५० व्या सुवर्ण महोत्सवी सांगीतिक मैफल गुरुवार रोजी दि. २६ मार्च २०२६ रोजी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात उत्साहात रंगली. या संगीत मैफिलीला रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एल पी अर्थातच लक्ष्मीकांत प्यारेलाल या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी संगीतकार जोडगोळीच्या सुरेल कारकिर्दीचा पट ‘गोल्डन माईलस्टोन – लक्ष्मीकांत प्यारेलाल’ या खास मैफलीतून साकार होत असताना लायन्स क्लब इंटरनॅशनलचे राजेश आगरवाल, रवी सातपुते यांच्यासह पिंपरी – चिंचवड आणि पुणे परिसरातील संगीत श्रेत्रातील विविध तंत्रज्ञ, गायक कलाकार आणि समाजातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. याशिवाय लायन्स क्लबच्या सहयोगाच्या रौप्य महोत्सवाचे औचित्य त्यामुळे सभागृह खचून भरले होते. राखी झोपे यांची संकल्पना आणि अनिल झोपे यांच्या निर्मितीतून साकार झालेल्या या सुवर्ण महोत्सवी सांगीतिक मैफलीला शुभेच्छा देताना राजेश आगरवाल यांनी, ‘इंडियन म्युझिकल क्लबने आपल्या सांगीतिक सुवर्ण महोत्सवाचे लक्ष्य गाठत असताना अवघ्या अडीच वर्षांच्या कालावधीत सुमारे १७० नवोदित आणि हौशी गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अनिल आणि राखी झोपे या दांपत्याने संगीताच्या माध्यमातून समाजात आनंद पसरविणे या संकल्पनेतून स्थापन केलेल्या या संस्थेने उत्तम कलाकार घडविण्यासोबतच समाजात कानसेन तयार केले आहेत!’ असे गौरवोद्गार काढले.

इंडियन म्युझिकल क्लब अर्थातच आय. एम. सी. च्या या मैफलीत स्वप्निल शेठ, अभय चिद्री, अमित पांचाळ, हृषीकेश क्षत्रिय, ओंकार पटवर्धन, राजेश नायर, पंकज श्रीवास्तव, अनिल झोपे, नम्रता सारडा, स्वाती केसकर, श्वेता महाबळेश्वरकर, प्राची कर्णिक, अमिता जाधव, अर्चना सपकाळ, श्रीया दास, अदिती खटावकर, रश्मी माटे, गौरिता कात्रे, मनीषा जोशी, सोनल वाणी, अनया नायर या गायकांनी वाद्यवृंदासोबत अतिशय दमदारपणे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचे प्रभावी सादरीकरण करीत श्रोत्यांची मने जिंकून घेतली. ‘दर्द – ए – दिल…’ , ‘मेरे दिलने…’ , ‘आते जाते खुबसुरत…’ , ‘शीशा हो या दिल हो…’ , ‘सांज ढले…’ , ‘सत्यम् शिवम् सुंदरम्…’ , ‘खातून की खिदमत में…’ , ‘कहे दो के तुम…’ , ‘मन क्यू बहेका?…’ , ‘रंग भरे मौसम से…’ , ‘मेघा रे मेघा रे…’ , ‘झूट बोले कौव्वा काटे…’ , ‘सावन का महिना…’ , ‘प्यार करने वाले…’ , ‘एक हसीना थी…’ , ‘रोज शाम आती थी…’ , ‘तू कितने बरस का?…’ , ‘तू मुझे कबूल…’ , ‘हंगामा हो गया…’ , ‘दरियाँ में फेक दो चाबी…’ , ‘छुप गये सारे नजारे…’ , ‘तेरा नाम लिया…’ , ‘काटे नही कटते…’ , ‘हम बंजारोंकी बात…’ , ‘आ जाने जाँ…’ अशा एकल आणि युगुलस्वरातील गीतांनी उत्तरोत्तर रंगतदार झालेल्या आणि अनिल झोपे व नम्रता सारडा यांनी गायलेल्या ‘मेरे जीवनसाथी…’ या वन्स मोअर मिळवणाऱ्या गीताने कळसाध्याय गाठलेल्या या मैफलीचा समारोप ‘ओम शांती ओम…’ या लोकप्रिय गीताने करण्यात आला. म्युझिक व्हिजनचे आशिष चौहान यांनी ध्वनिसंयोजन केले. चिंतन मोढा आणि अमन खान (की बोर्ड), हार्दिक रावळ (गिटार), असिफ खान (ऑक्टोपॅड आणि रिदम मशीन), हर्षद गनबोटे (तबला आणि ढोलक) यांनी साथसंगत केली. आय एम सीचे संजय वाघचौरे यांनी ध्वनिसंयोजन व छायाचित्रण केले. विक्रम क्रिएशन्सने दृकश्राव्यचित्रण केले. आय एम सीचे दीपक निस्ताने, धनश्री भोळे, विभावरी पाटील, निखिल वाणी आणि प्रशांत चौधरी यांनी संयोजन आणि रंगमंच व्यवस्थेची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. मनीष गोखले आणि नम्रता सारडा यांनी खुसखुशीत शैलीतून मैफलीचे निवेदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *