पिंपरी चिंचवड – दि.१९ जानेवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजित पहिल्या टप्प्याच्या दिवशी म्हणजेच मंगळवार दि.२० जानेवारी रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील स्पर्धा मार्गावरील सर्व प्रकारच्या खाजगी आणि सरकारी शाळांना मंगळवार, २० जानेवारी २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

पुणे जिल्हा प्रशासन, बजाज तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बजाज पुणे ग्रँड टूर-२०२६ युसीआय मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा दि.१९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
या टप्प्याचा मार्ग असा असेल –
स्पर्धेची सुरुवात:
टी.सी.एस सर्कल, हिंजवडी फेज-३
मार्ग: पुढे टी.सी.एस सर्कल – मेगापोलीस सर्कल – सिंफोनी सोसायटी समोरुन उजवीकडे वळून – बापुजी बुवा मंदिर मार्गे पुणे ग्रामीण हद्दीत प्रवेश
परतीचा मार्ग: डोणे फाटा येथून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करुन पुढे रोहिदास मारुती सावळे चौक (डोणे फाटा) – डावीकडे वळून आढले बुद्रुक – बेबड ओहळ – चांदखेड – कासारसाई – नेरे – मारुंजी – लक्ष्मी चौक – भुमकर चौक – अंडरपास मार्गे – डांगे चौक – अंडरपास मार्गे आदित्य बिर्ला हॉस्पिटल समोरुन – रिव्हर व्ह्यू चौक – वाल्हेकरवाडी टी जंक्शन – डावीकडे वळून छत्रपती शिवाजी महाराज चौक वाल्हेकरवाडी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रावेत.
समाप्ती: उजवीकडे वळून डॉ. डी. वाय पाटील कॉलेज, आकुर्डी येथे समाप्त होईल.
सदर आदेशात, सदर स्पर्धा मार्गावरील सर्व प्रकारच्या खाजगी आणि सरकारी शाळांना दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
काय आहे पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६?
पुण्यात आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ या भव्य सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दि.१९ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान ही सायकल स्पर्धा पुण्यासह विविध भागात होत आहे.
या स्पर्धेचा पहिला टप्पा पिंपरी चिंचवड शहरातील भागात होत असून स्पर्धेला मोठा प्रतिसाद आहे.
सायकलिंग स्पर्धेतील ‘प्रोलॉग रेस’ १९ जानेवारी रोजी पुणे शहरात झाली त्यासाठी सकाळी ९ ते सायं ६ या वेळेत शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवले गेले. यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रोड (एफ.सी. रोड), गणेशखिंड रोड, जंगली महाराज रस्ता (जे.एम. रोड) आणि या मार्गांना जोडणारे उपरस्ते यांचा समावेश होता.
