समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन –
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

Share this News

– मुंबई येथे संघ प्रवासाची १०० वर्षे : नवे क्षितिज – दोन दिवसीय संवाद

मुंबई दि.७ फेब्रुवारी (सिटीनामा वृत्तसेवा) : संघाला समाजरूप संघटन उभे करायचे आहे. समाज संघटित व गुणवान होईल तेव्हाच देशात परिवर्तन येईल. नेता-नारा-निती-पक्ष-अवतार-सरकार-विचार-तत्वज्ञान या सर्व गोष्टी सहाय्यक आहेत. समाज या सर्वांचा मालक आहे. त्यामुळे मालकाने मुळात जागरूक असायला हवे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘संघ प्रवासाची १०० वर्षे : नवे क्षितिज’ या दोन दिवसीय संवाद कार्यक्रमात मुंबईतील ९०० हून अधिक प्रतिष्ठित मान्यवर व्यक्तिमत्त्वांना त्यांनी संबोधित केले. नेहरू सेंटर, वरळी येथे शनिवार, दि. ०७ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या पहिल्या सत्रात डॉ. मोहनजी भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रेरणादायी प्रवास, त्याची ऐतिहासिक वाटचाल आणि समाजातील योगदान यांचा सविस्तर आढावा घेत, स्थापनेपासून ते आज राष्ट्रनिर्मितीतील भूमिकेपर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. याप्रसंगी व्यासपीठावर पश्चिम क्षेत्र संघचालक डॉ.जयंतीभाई भाडेसीया, कोकण प्रांत संघचालक अर्जुन चांदेकर, मुंबई महानगर संघचालक सुरेश भगेरिया उपस्थित होते. 

पहिल्या सत्रात उपस्थितांना संबोधत सरसंघचालक म्हणाले, संघाचे स्वयंसेवक संचलन करतात पण ते काही पॅरामिलिटरी ऑर्गनायझेशन नाही, संघाचे स्वयंसेवक लाठीकाठी चालवतात मात्र संघ काही अखिल भारतीय आखाडा नव्हे, संघात भारतीय रागांच्या आधारावर घोष, वैयक्तिक गीत, सांघित गीत होतात म्हणून संघ काही अखिल भारतीय संगीतशाळा नव्हे. संघाचे स्वयंसेवक राजकारणात सुद्धा आहेत, म्हणून तो राजकीय पक्ष नव्हे. केवळ बाह्यरुपावरून संघाचे मुल्यमापन केल्यास गैरसमज निर्माण होतील. संघाला जाणून घ्यायचे असेल तर संघ शाखेचा अनुभव घ्यावा लागेल. संघाची शाखा, कार्यकर्ते, त्यांचा परिवार, कार्यक्रम, वर्ग, शिबीरे, यांचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास संघ यथार्थ समजेल. 

पुढे ते म्हणाले, संघाचे कार्य देशासाठी आहे. संघ कोणाशी स्पर्धा करण्यासाठी किंवा प्रतिक्रियेतून चाललेला नाही. संघ कोणाच्या विरोधात नाही. कोणाचाही विरोध न करता संघाचे कार्य चालते. संघ सत्ता वा प्रसिद्धीची आकांक्षा बाळगत नाही. 

संघ स्थापनेच्या पार्श्वभूमीबाबत बोलताना सरसंघचालक म्हणाले, संघसंस्थापकांनी स्वातंत्र चळवळीच्या सर्व प्रवाहांचा अनुभव घेतला, चिंतन केले. इतिहासातही आपण वारंवार गुलाम झालो. पराक्रमाने स्वातंत्र परत मिळविले परंतु ते टिकले नाही. आताही आपल्याला स्वातंत्र मिळेल मात्र पुन्हा गुलामी येणार नाही याची शाश्वती काय? आपण आपली एकजूट विसरलो, स्वार्थ वाढला, समाज गुणहीन बनला, शिस्त राहिली नाही. दारिद्र्य, गरीबी तसेच अज्ञान निर्माण झाले. समाजाला गुणवान, अनुशासीत, संपन्न व संघटित बनविल्याशिवाय स्वातंत्र्य टिकवता येणार नाही. याच हेतूने डॉ. हेडगेवार यांनी विभिन्न प्रयोगाचा अवलंब करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १९२५ साली स्थापना केली.

भारताचा स्वभाव सनातन असल्याचे सरसंघचालकांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “धर्मनिरपेक्षता शब्द चुकीचा असून पंथनिरपेक्षता असा शब्द असायला हवा. वाहणे हा पाण्याचा, जळणे हा अग्नीची धर्म आहे, तसाच धर्म हा आपला स्वभाव, कर्तव्य असून इहलोकात-परलोकात सुख देतो. धर्म सर्वाना उन्नत करतो. धर्म ज्या सत्याच्या आधारावर उभा आहे, तो अस्तित्वाच्या एकतेचा संदेश आहे. आपल्याला महासत्ता व्हायचे नाही. महासत्ता बळाने आपले वर्चस्व प्रस्थापित करते. आपण विश्वगुरू बनू. संपूर्ण जगाला जोडू.”

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात उपस्थितांना संबोधित करताना सरसंघचालक म्हणाले, “आपल्या समाजाच्या संघटित शक्तीच्या आधारावर देशाला बलशाली बनवण्यासाठी समाज सशक्त करणे, या ध्येयाने संघ पुढे जात आहे. आपण यात सहभागी झालात तर कार्य अधिक वेगाने होईल. दैनंदिन शाखेत उपस्थित राहून शरीर-मन-बुद्धीचा व्यायाम करणे हे तर काम आहेच, परंतु आपापल्या रुची आणि क्षमतेनुसार स्वयंसेवकांनी वा सज्जनशक्तीने चालविलेल्या देशहिताच्या कामात सहभागी होणे किंवा प्रामाणिकपणे व निस्वार्थबुद्धीने समाजहितासाठी कोणतेही कार्य केल्यास तुम्ही संघाचेच काम करता आहात असे संघ समजतो. याही मार्गाने आपण संघाशी स्वतःला जोडून घेऊ शकता. ‘If you have a theme, we have a team; If you have a team, we have a theme’ अशी आज संघाच्या संघटनेची स्थिती आहे.

स्वदेशी आणि स्वबोध यांवर भाष्य करतांना सरसंघचालक म्हणाले, बऱ्याचशा विदेशी वस्तू आहेत ज्यांच्याशिवाय आपला दैनंदिन व्यवहार चालू शकतो. बऱ्याचशा अशा भारतीय गोष्टी आहेत ज्या विदेशी वस्तूंपेक्षा अधिक चांगल्या आहेत. आपल्या देशाचा रोजगार कसा वाढेल याचा विचार करूनच त्यानुसार वस्तू खरेदी करण्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. अपरीहार्य असलेला आंतरराष्ट्रीय व्यवहार सुद्धा कुणाच्या दबावाखाली न येता आपल्या देशातील वातावरणाला अनुकुल पद्धतीने करणे शक्य होईल.

सामाजिक समरसता, पर्यावरण, स्वबोध, कुटुंब प्रबोधन, संविधान आधारित नागरी कर्तव्यांचे पालन या पाच बिंदूंवर दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त भर देण्याचा आग्रह स्वयंसेवकांनी तसेच सर्वांनी धरावा हा संघकार्याच्या सध्याच्या मांडणीचा प्रमुख भाग असून पंचपरिवर्तन या नावाने तो सरसंघचालकांनी आपल्या भाषणातून विस्ताराने प्रतिपादित केला. या पंचपरिवर्तनाच्या व्यवहारात प्रारंभी स्वयंसेवकांनी पुढाकार घ्यावा आणि हळूहळू तो समाजात संक्रमित होईल यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे उद्योगपती, चित्रपटसृष्टीतील मान्यवर, डॉक्टर, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, कायदेपंडित, क्रीडापटू, माध्यम प्रतिनिधी, सामाजिक संस्थांचे सदस्य, धर्मगुरू, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, सोशल मीडिया प्रभावक तसेच जाहिरात क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी झाले. त्यामध्ये राधाकिशन दमानी, अभिनेता सलमान खान, रणबीर कपूर, हेमा मालिनी, सज्जन जिंदल, दीपक पारेख, अजय पिरामल, सुभाष चंद्रा, रोनी स्क्रूवाला, विनित जैन, सुभाष चंद्रा, नितेश तिवारी, मोहित सुरी, रमेश तौरानी, बोनी कपूर, ओम राऊत, ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई, पार्श्वगायक अदनान सामी, दिग्दर्शक विपूल शहा, इंदर कुमार, प्रसाद ओक, आयआयटी मुंबईचे शिरीष केदारे, स्वामी स्वरूपानंद, अक्षत गुप्ता, अभिनेत्री अश्विनी भावे, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, संस्कार भारती कोकण प्रांत अध्यक्ष अभिनेते सुनील बर्वे, गायक अदनान सामी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, इस्त्रायल-इटलीच्या राजदूतावासाचे अधिकारी, भारतातील सिंधी गुरुद्वारांचे प्रमुख जसकीरतजी भाईसाहेब, अमर सिंहजी कल्सी नाखुदा, राम सिंह राठोड, कॅबिनेट मंत्री नितेश राणे, खासदार व ज्येष्ठ अधिवक्ता उज्ज्वल निकम, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यामुळे संघाचा व्यापक व समावेशक संपर्क अधोरेखित झाला.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सहज संवादावर भर देण्यात आला असून, दुसऱ्या दिवशी सर्वसमावेशक प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सहभागी सदस्यांना विविध राष्ट्रीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर थेट प्रश्न विचारण्याची आणि स्पष्टता मिळवण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील एक महत्त्वाचा टप्पा ठरतो.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य विवेक भागवत यांनी केले. व्यासपीठावरील उपस्थितांचा परिचय मुंबई महानगर सहसंघचालक डॉ. विष्णू वझे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी यांनी केले. संघाच्या शाखेचा विस्तार, गृहसंपर्क अभियान, समाजातील गणमान्य व्यक्तिमत्वांशी संपर्क असे विविध कार्यक्रम येत्याकाळात संघाच्या माध्यमातून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
===============

पंथ, उपासना पद्धती, चालीरिती यामधील वैविध्य सांभाळूनही आपापल्या मार्गाने सर्वजण एकाच सत्याकडे जातात, ही हिंदू मानसाची श्रद्धा आहे. ‘रुचीनां वैचित्र्यादृजुकुटिलनानापथजुषाम्। नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव॥’ या शिवमहिम्न स्तोत्रातील वचनातून तसेच, ‘सब्ब पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा ! सचित्त परियोदपणं येतमं बुद्धानुशासनं’ या भगवान बुद्धांच्या शिकवणीमधूनही तोच भाव प्रकट होतो, याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले.
==============

वस्त्यावस्त्यांमध्ये, गावोगावी चारित्र्यसंपन्न, निस्वार्थबुद्धीने काम करणाऱ्या आणि सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या प्रामाणिक व्यक्तींची उदाहरणे निर्माण व्हावीत आणि देशव्यापी बनावीत यासाठी संघ कार्य करतो, असे डॉ. मोहनजी भागवत यावेळी म्हणाले.
=================

सज्जनांशी मैत्री हा मूलभूत भाव  

आपण समाजाच्या प्रेम आणि सज्जनतेच्या भावनेच्या बळावर चाललो आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासावर पुढे गेलो. संघाला विरोध झाला; आजही होत आहे. परंतु विरोधकांविषयी कटुता न बाळगता संघाचे कार्यकर्ते पुढे गेले. सज्जनांशी मैत्री आणि सज्जन शक्तीचे जागरण हा आमचा मूलभूत भाव राहिला. काळ बदलला, परिस्थिती बदलली; पण दिशा तीच ठेवून संघ पुढे जात आहे. देशभरात समाजाच्या सहकार्याने एक लाख तीस हजारांहून अधिक सेवाकार्य सुरु आहेत. साप्ताहिक किंवा दैनिक शाखांच्या माध्यमातून देशातील सुमारे साडेसहा लाख गावे व ४३ हजार शहरी वस्त्यांपैकी सुमारे सव्वालाख गावे व २३ हजार वस्त्यांपर्यंत संघाचे कार्य पोहोचले आहे. शताब्दी वर्षांच्या निमित्ताने याचा विस्तार अधिक व्यापक करण्याचा संघाचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *