दुर्ग हे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक – पांडुरंग बलकवडे

-किल्ले लोहगड-विसापूर अभ्यासवर्ग उत्साहात

Share this News

विसापूर दि.८ फेब्रुवारी (सिटीनामा वृत्तसेवा)

*श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, लोहगड विसापूर विकास मंच व श्री शिवशंभू विचार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले लोहगड विसापूर अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.*

अभ्यास वर्गाचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील व रा. स्व. संघाचे  संदीप जाधव उपस्थित होते. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने अभ्यास वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्यांनी भारतीय व मराठेशाहीच्या इतिहासाशी संबंधित भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्व समजून घेण्यासाठी अशा प्रकारच्या अभ्यासवर्गाचे महत्व अधोरेखित केले.

अभ्यास वर्गाच्या प्रथम सत्रात ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. प्र. के. घाणेकर सरांनी लोहगड व विसापूर किल्ल्यांची स्थापत्य व नैसर्गिक रचना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात लोहगड विसापूर विकास मंचाचे कार्य व व्याप्ती याविषयी संस्थापक सचिन टेकवडे व संदीप गाडे यांनी मंचाची २५ वर्षांची वाटचाल, आव्हाने व भविष्यातील वाटचाल याविषयी माहिती दिली. ‘संघटन मावळ्यांचे, संवर्धन गड-किल्ल्यांचे’ या ब्रीद वाक्यानुसार मंचाचे कार्य सुरू असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. तृतीय सत्रात भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी गजानन मंडावरे यांनी पुरातत्व विभागाची रचनात्मक कार्यशैली, पुणे विभागातील संवर्धनाची विविध कार्ये तसेच, सरकारी नोकरीच्या विविध संधी याविषयी मार्गदर्शन केले.

शेवटच्या सत्रात ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी मार्गदर्शन केले. *भारतीय अतिप्राचीन इतिहास ते शिवकालीन इतिहास असा मागोवा घेतला. काळानुसार वेगवेगळ्या प्रकारची दुर्गरचना आपल्याला पहायला मिळते. तसेच,  “दुर्ग हे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे” असे नमूद करताना दुर्गमहती अधिरेखित केली.*

समारोप सत्रात श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात यांनी सांगितले की, हा अभ्यासवर्ग फलद्रूप होण्यासाठी सर्वांनी ही शिकवण आपापल्या कार्यक्षेत्रात आचरणात आणावी.

यावेळी असंख्य अभ्यासक उपस्थित होते. वर्गासाठी सह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल व रा. स्व. संघाचे विभाग सहकार्यवाह अविनाश भेगडे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन रुपेश मोरे, गणेश उंडे, अमोल गोरे, महेश सोनपावले, निलेश माटे, मल्हार टेकवडे, शुभम मोटे, हर्षदा धुमाळ आदी कार्यकर्त्यांनी केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *