-चंद्रशेखर टिळक यांचे व्याख्यान;स्व.दत्तोपंत म्हसकर संस्थेतर्फे आयोजन निगडी दि.५ फेब्रुवारी (सिटीनामा वृत्तसेवा) यावर्षीचा अर्थसंकल्प हा भारताचे आत्मनिर्भरतेचे पाऊल मजबूत करणारा असून संपूर्ण देशाचा विकासदर गतिमान राखणारा व तेवढाच सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देखील देणारा अर्थसंकल्प असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी निगडी प्राधिकरण येथील अरविंद – वृंदा सभागृह, स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे बुधवार, दि. ४ फेब्रुवारी रोजी केले. स्व.दत्तोपंत म्हसकर संस्थेच्या वतीने ‘अर्थसंकल्प विश्लेषण २०२६’ या विषयावरील विशेष व्याख्यानात टिळक बोलत होते. उद्योजक रमाकांत उत्तुरकर, सनदी लेखापाल मनोज देशपांडे, म्हसकर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पवार, सचिव मिलिंद कुलकर्णी, सहसचिव डाॅ. भाग्यश्री अत्रे – जोशी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. चंद्रशेखर टिळक पुढे म्हणाले की, ‘१८५८ मध्ये आपल्या देशाचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. त्या अर्थसंकल्पापासून ते आजतागायत सादर झालेल्या सर्व अर्थसंकल्पांचा मी अभ्यास केला असून सलग चाळीस वर्षांपासून केंद्रीय अर्थसंकल्पांचे जाहीर विश्लेषण करण्याची संधी मला मिळालेली आहे. रविवार, दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सलग नऊ वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी लाभली. १३१ पृष्ठांचा अन् १७८ परिच्छेद असलेला यंदाचा अर्थसंकल्प वैशिष्ट्यपूर्ण असून डीसेन्ट्रलाझेशन (विकेंद्रीकरण), डीइन्व्हेस्टमेंट (निर्गुंतवणूक), डिझेल (खनिज तेल) आणि डिफेन्स (संरक्षण) या चार ‘डी’चा यामध्ये प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. अमेरिकेची सत्ताकांक्षा, चीनची विस्तारवादी महत्त्वांकाक्षा, पाकिस्तान आणि बांगलादेश या आपल्या शेजारील राष्ट्रांचे उपद्रवमूल्य यांना शह देण्याचा प्रयत्नही या अर्थसंकल्पात आहे. संपत्तीचे विकेंद्रीकरण, पायाभूत उत्पादनांतून निर्गुंतवणूक, जागतिक अर्थकारणातील खनिज तेल अन् दुर्मीळ खनिजांचे वाढते महत्त्व आणि संरक्षणसज्जता या बाबत सक्षमता वाढविण्यासाठी आत्मनिर्भर भारत यांसारख्या विविध उपक्रमांवर भर देण्यात आला आहे. करदात्यांना दिलासा देत असतानाच देशाचा विकासदर गतिमान राखणारा हा अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्य नागरिक ते राष्ट्र यांना दिलासादायक ठरेल!’ मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे चंद्रशेखर टिळक कार्यक्रमस्थळी पोहोचू शकले नाहीत; परंतु सभागृहातील मोठ्या पटलावर ऑनलाइनवरून दृकश्राव्य माध्यमातून अतिशय ओघवत्या अन् अभ्यासपूर्ण विवेचन शैलीतून त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधला. दीपप्रज्वलन, अखंड भारतमाता प्रतिमापूजन तसेच स्व.अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. मिलिंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेने संस्कार, शिक्षण, आरोग्य या आयामात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. रमाकांत उत्तुरकर यांनी संस्थेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. याप्रसंगी क्रीडा क्षेत्रात नैपुण्य प्राप्त केल्याबद्दल आरती पवार, सिद्धी परब, सुजल पंडित या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. चैतन्य पंडित यांनी सूत्रसंचालन केले. किरण कुलकर्णी यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
