हिंदूंना त्यांच्या अस्मितेची वारंवार आठवण करून द्यावी लागते – शरद पोंक्षे

Share this News

पुणे दि. २४ मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)
हिंदुंना त्यांच्या महान वारशाची आणि अस्मितेची वारंवार आठवण करून द्यावी लागते.
स्वातंत्र्याला ७९ वर्षे उलटूनही, हिंदू बहुल भारतात हिंदुंनाच आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो, ही मोठी शोकांतिका आहे. जोपर्यंत हिंदू समाज संघटित होऊन स्वतःच्या हक्कांसाठी पूर्णपणे जागा होत नाही तोपर्यंत हिंदुंचे एकत्रीकरण आवश्यक असल्याचे परखड मत ज्येष्ठ मराठी रंगकर्मी व सिनेअभिनेते, व्याख्याते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
कोथरूड येथील परमहंस नगर येथे आयोजित ‘हिंदू संमेलना’त ते बोलत होते. या संमेलनात आबालवृद्धांसह परिसरातील नागरिक उत्स्फुर्तपणे सहभागी झाले.
भारतावर सातत्याने आक्रमणे झाली. त्यामुळे हिंदुंच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. ब्रिटिशांनी हिंदुंना आपल्या इतिहासापासून, संस्कृतीपासून, भाषेपासून तोडले. इंग्रजी आपल्यावर लादली. त्यामुळे हिंदुंना आपल्याच संस्कृतीची, धर्माची लाज वाटायला लागली. ब्रिटिशांनी हिंदूंपासून शस्त्र तोडलं. फक्त देवीदेवतांच्या हातात शस्त्र आहेत. पण हिंदुंच्या हातात शस्त्र नाहीत. त्यातच स्वातंत्र्यानंतर आलेल्या काँग्रेसने अहिंसेच्या नावाखाली हिंदुंना दुबळे, घाबरट बनवले. हिंदू समाजाचे सर्वाधिक नुकसान केले असे पोंक्षे यावेळी बोलताना म्हणाले.
ते पुढे म्हणाले, २०२४ च्या निवडणुकीत आपण काठावर पास झालो. अन्यथा आपली धडगत नव्हती. कुंभकर्णापेक्षाही हिंदू समाजाची झोप गाढ आहे. भारत हिंदूराष्ट्र होता, आहे आणि राहील असे म्हणून उपयोग नाही. प्रत्यक्ष अधिकृतरित्या भारत हिंदूराष्ट्र घोषित व्हायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भारतीय शिक्षणपद्धती आदर्श शिक्षणपद्धती होती याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, भारतात सर्व वर्ण समान समजले गेले आहेत. ब्राह्मण श्रेष्ठ किंवा शूद्र कनिष्ठ असे कधीच नव्हते. सर्वांशी प्रेमाने वागणे, माणुसकीने वागणे हा मानवधर्मच हिंदू धर्म आहे. संपूर्ण विश्वासाठी प्रार्थना करणारा हिंदू धर्म आहे. मात्र ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक फोडा आणि झोडा या नीतिअंतर्गत जातीभेद निर्माण केले.
आर्थिक नाकाबंदी हे सर्वसामान्य हिंदुंचे शस्त्र –
एकेकाळी १०० टक्के हिंदू असलेले काश्मीर आज १०० टक्के मुस्लिम झाले आहे. हिंदुंनी जागरूक असणे गरजेचे आहे. भाजीपाला, फळे, सुतारकाम, इलेक्ट्रिशियन, रिक्षा, टॅक्सीवाले असे सर्व हिंदूच असतील याची खात्री करून मगच आर्थिक व्यवहार करा. हलाल सर्टिफिकेट असलेल्या वस्तूंवर बहिष्कार घाला. शेजारच्या घरातील मुलगी लव जिहादमध्ये बळी पडली, पण आपल्या घरातील मुलगी सुरक्षित आहे म्हणून शांत बसू नका असेहीआवाहन यावेळी पोंक्षे यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुंदा पानसे भजनी मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला गेला. तर सुकृती कथ्थक डान्स अकॅडमीतर्फे गणेश वंदना सादर करण्यात आली.सुनील ढोले यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी संघाच्या परमहंस नगराचे संघचालक हिरामण जगताप, नगरसेविका ज्योत्स्ना कुलकर्णी, मनीषा बुटाला, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, दिनेश माथवड, जगन्नाथ कुलकर्णी, डॉ. संदीप बुटाला, दिलीप चोरघे, नथाराम राठोड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *