वाकड / पुणे दि.२१ (सिटीनामा वृत्तसेवा)
जातीपाती सोडा हिंदू म्हणून एकत्रित या असा संदेश विराट हिंदू संमेलनाच्या निमित्याने गुंजला. आपल्या जातीपातीचा भेद बाजूला ठेऊन सकल हिंदूंनी एकत्र येऊन सामूहिक चिंतन करावे हाच हिंदू संमेलनाचा उद्देश असल्याचे हिंदू संमेलनात अधोरेखित झाले.
पिंपळे निलख भागातील कस्पटे वस्ती येथे नुकतेच विराट हिंदू संमेलन चिलेकर निवास मैदान, छत्रपती चौक, कस्पटे वस्ती, वाकड अतिशय उत्साहात संपन्न झाले. संमेलनासाठी मुख्य वक्ता म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रचार प्रमुख अतुलजी अग्निहोत्री उपस्थित होते. ह. भ. प. महादेव महाराज भुजबळ यांनी आशीर्वचन दिले.
कार्यक्रमाची सुरुवात शोभायात्रेने झाली. शोभायात्रा म्हातोबा चौक येथे सुरू होऊन संमेलन स्थळी पोहोचली. संमेलनाचे संयोजक संतोष जी कस्पटे, सहसंयोजक संदीप तथा नाना चिलेकर, ह. भ. प. श्री. महादेव महाराज भुजबळ आणि अतुलजी अग्निहोत्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती सीमाताई गोखले यांनी केले. त्यानंतर गणेश वंदना, मैत्रीबोध परिवाराचे सदस्य मित्र काशिनाथ यांचे माहितीपर उद्बोधन आणि इतर संस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.
संघ शताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक वार्तापत्राच्या विशेष अंकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
ह. भ. प. श्री. महादेव महाराज भुजबळ यांनी आपल्या आशिर्वचन संबोधनात धर्म आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देत असतो आणि मनात सेवाभाव असेल तर त्यात जातीधर्माच्या भिंती आड येऊ नये असे मत मांडले.
यानंतर प्रमुख वक्ते अतुलजी अग्निहोत्री यांनी आपले विचार मांडले.
हिंदूंनी एकत्र येऊन चिंतन करावं यासाठी अशा हिंदू संमेलनाचे आयोजन देशभर केले आहे हे अतुलजींनी सांगितले.
हिंदुत्व म्हणजे कर्मकांड किंवा पूजा पद्धती नाही तर सर्वसमावेशकता आहे. हिंदुत्व कोणत्याही एका देवाशी जोडलेली नाही. त्यामुळे या देशात राहणारे सगळे हिंदू आहेत. गेली १०० वर्षे संघ हिंदूंना एकत्र करण्याचे काम करत आहे.
यानंतर अतुल
अग्निहोत्री यांनी पंचपरिवर्तनाचे मुद्दे मांडले. कुटुंबप्रबोधन, सामाजिक समरसता, स्वबोध, पर्यावरण आणि नागरी शिष्टाचार या गोष्टीत आपण समाज म्हणून काय करावे याविषयी मार्गदर्शन केले.
राष्ट्रनिर्माणाचा हा यज्ञ जो संघाने सुरू केला त्यात आपले सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे देशाला पुन्हा एकदा परम वैभवाला नेण्यासाठी आपण सहभागी व्हावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय कुलकर्णी तर आभारप्रदर्शन संदीप पाटील यांनी केले.
संपूर्ण वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमानंतर प्रसाद वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुधीर अयाचित, अनंतराव देशमुख, दिलीप देशपांडे, विजय थोरात, संदीप अण्णा कस्पटे, प्रसाद कस्पटे व कस्पटे वस्ती मधील सामाजिक कार्यकर्ते, संस्था, मंडळे यांनी प्रयत्न केले.
