-पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला आ.महेश लांडगेंची कार्यवाहीची सूचना
पिंपरी दि.३० जानेवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
नुकत्याच एका दुर्देवी विमान अपघातात राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, लोकनेते अजितदादा पवार यांचे अकाली अपघाती निधन झाले. या घटनेमुळे महाराष्ट्रासह देश हळहळला. बारामतीप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरावर देखील अजितदादांचे असलेले प्रेम सर्वश्रुत होते. पिंपरी चिंचवड शहर देशात क्रमांक १ चे शहर बनविण्याचे अजितदादांचे स्वप्न होते. अजितदादांनी त्यांच्या कारकिर्दीत पिंपरी चिंचवड शहरात अनेकविध प्रकल्पे आणून शहरातील विकासाला मोठी चालना दिली. शहरातील प्रत्येक भागाचा त्यांना अभ्यास होता. शहरातील रस्ते, उड्डाणपूल, शासकीय इमारती, महत्वाचे प्रशासकीय कार्यालये, महानगरपालिकेचे अनेक महत्वपूर्ण प्रकल्प याकडे विशेष लक्ष देऊन त्यांनी पूर्णत्वास नेले. अशा लोकनेत्याला श्रद्धांजली म्हणून दिवंगत अजितदादांच्या स्मरणार्थ अजित सृष्टी उभारून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्याच्या हेतुने भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांनी अजित सृष्टी उभारण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या असून नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत यासंबंधी ठराव मंजूर करण्याबाबत ठरल्याची माहिती मिळाली आहे.
