शेगाव दि.७ (सिटीनामा वृत्तसेवा)
बोला “अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज सच्चिदानंद परब्रह्म भक्तप्रतिपालक शेगावनिवासी समर्थ सद्गुरू श्री संत गजानन महाराज की जय..!!” या जयघोषात विदर्भपंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या प्रकटदिनानिमित्य लाखो भाविकांची मांदियाळी आहे.
माघ सप्तमी ८ फेब्रुवारी रविवार रोजी श्री संत गजानन महाराजांचा प्रकटदिन. यानिमित्याने श्रीक्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज समाधी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत राज्यासह देशातील विविध भागातून देखील भाविक शेगाव येथे येतात त्याचबरोबर राज्यातील अनेक ठिकाणांहून भजनीदिंड्या शेगाव येथे दाखल झाल्या असून वारकरी भाविक मोठ्या संख्येने शेगाव येथे दाखल झाले आहेत. भाविकांची गर्दी लक्षात घेता व सर्व भाविकांना सुलभपणे श्रींचे दर्शन घेता यावे यासाठी श्रींचे समाधी मंदिर दि.७ व ८ फेब्रुवारी रोजी रात्रभर खुले राहणार असल्याचे संस्थानतर्फे कळविण्यात आले आहे. रात्री उशिरा येणाऱ्या भाविकांना देखील श्रींच्या दर्शनाचा लाभ घेता येऊन पहाटे महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे. या विशेष व्यवस्थेचा लाभ भाविकांनी घेण्याचे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. अनेकजण अकोला -गायगाव , खामगाव वरून देखील पायदळ दिंड्या घेऊन दाखल होत आहेत.
श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव : एक आदर्श संस्थान व उत्तम व्यवस्थापन
भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था
मंदिर परिसर स्वच्छता तसेच भाविकांना श्रींचे दर्शन सुलभतेने घेता यावे यासाठी संस्थान कायम प्रयत्नरत असते. श्रीक्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थान हे व्यवस्थापनाचा आदर्श असून येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला श्रींच्या दर्शनानंतर तृप्त झाल्यासारखे वाटते. संस्थानतर्फे पिण्याचे पाणी, निवास व्यवस्थेसाठी सुसज्ज व सुंदर भक्तनिवास, पार्किंग, परिसर स्वच्छता, महाप्रसाद, पादत्राणे व्यवस्था, शिस्तबद्ध दर्शनबारी, चौकशी कक्ष, ठिकठिकाणी असलेले निःस्वार्थ सेवाधारी यामुळे भाविकांना पदोपदी महाराजांच्या आशीर्वादाची जाणीव होते.
महाराजांच्या प्रकटदिनी सिटीनामा NEWS तर्फे श्री संत गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग नमन!!
जय गजानन!!
