‘बेलाच्या पानावर…’चे प्रकाशन संपन्न

Share this News

पिंपरी दि. ०७ फेब्रुवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
‘प्रतिभावंतांनी अत्युच्च स्फूर्तीची प्रतीक्षा करावी!’ असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी कवयित्री शांता शेळके सभागृह, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी व्यक्त केले. कविवर्य राजन लाखे लिखित ‘बेलाच्या पानावर…’ या हायकूसंग्रहाचे प्रकाशन करताना प्रा. मिलिंद जोशी बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, पुणे जिल्हा प्रतिनिधी डाॅ. पुरुषोत्तम काळे, लोकसाहित्याचे अभ्यासक प्रभाकर ओव्हाळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या उपाध्यक्षा प्रा. डॉ. रजनी शेठ, राजन लाखे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. मिलिंद जोशी पुढे म्हणाले की, ‘कवितेलाही आचारसंहिता असते याचे बहुसंख्य कवींना विस्मरण झाले आहे. त्यामुळेच मुक्तच्छंदाला मोकाट छंदाचे रूप प्राप्त झालेल्या आजच्या काळात ‘बेलाच्या पानावर…’ यासारख्या संग्रहातील छंदबद्ध, आशयसंपन्न हायकू मनाला सुखावणारे आहेत. राजन लाखे हे प्रयोगशील कवी असल्याने तंत्र आणि प्रतिभा यांचा सुरेख संगम त्यांच्या काव्यरचनांमध्ये आढळून येतो. सत्याचे अव्वल दर्शन घडविण्यासाठीही प्रतिभा आवश्यक असते!’ सुनीताराजे पवार यांनी, ‘अल्पाक्षरी हायकूत खूप मोठा आशय व्यक्त करण्याचे सामर्थ्य असते, हे ‘बेलाच्या पानावर…’ या संग्रहातून प्रत्ययास येते!’ असे मत व्यक्त केले. विनोद कुलकर्णी यांनी, ‘राजन लाखे हे कवी अन् कवितांसाठी जगणारे व्यक्तिमत्त्व आहे!’ असे गौरवोद्गार काढले. राजन लाखे यांनी आपल्या मनोगतातून, ‘सतरा अक्षरे अन् तीन ओळींचे बंधन असलेला हायकू हा कवी मात्सुओ बाशो यांचा मूळ जपानी काव्यप्रकार शिरीष पै यांनी मराठीत रूढ केला. सतरा अक्षरे अन् तीन ओळी याच्या मर्यादेत राहून सुमारे २४० हायकूंच्या माध्यमातून मी आशयप्रधान भावनांचे चित्र जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे!’ अशी भावना व्यक्त केली.

याप्रसंगी पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विविध शाखाध्यक्षांचा तसेच ‘बेलाच्या पानावर…’च्या निर्मितिप्रक्रियेत सहभागी झालेल्या नंदकुमार मुरडे, सुप्रिया ऐनापुरे, अजित जमदाडे यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेतील किरण जोशी, जयश्री श्रीखंडे, किरण लाखे, श्रीकांत जोशी, किशोर पाटील, इला पवार, नीलिमा फाटक यांनी संयोजन केले.  दिनेश भोसले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. रजनी शेठ यांनी आभार मानले. भूषण तोष्णीवाल यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *