पुणे दि.२७ जून (सिटीनामा वृत्तसेवा)
अलीकडे एका शासकीय कार्यक्रमामध्ये आमदार मेधाताई कुलकर्णी यांच्याबाबत घडलेली घटना अत्यंत वेदनादायी व दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया समस्त ब्राह्मण समाज पुणे महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. सचिन बोधनी यांनी व्यक्त केली आहे.
सदर कार्यक्रम हा शासकीय स्वरूपाचा असून कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांच्या आसनव्यवस्थेबाबत शासनाकडून पूर्वनियोजन करण्यात आलेले होते. अशा परिस्थितीत “हा अमुक समाजाचा कार्यक्रम आहे आणि मेधाताई कुलकर्णी यांनी पुढील व्यासपीठावर बसू नये” अशा स्वरूपाचे वक्तव्य होणे हे अयोग्य असल्याचे डॉ. बोधनी यांनी म्हटले आहे.
लोकशाही व्यवस्थेमध्ये एखादा आमदार, खासदार किंवा लोकप्रतिनिधी संविधानानुसार शपथ घेऊन सर्व समाज, सर्व जाती आणि सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी स्वीकारत असतो. त्याचप्रमाणे मेधाताई कुलकर्णी यांनीही आपल्या सार्वजनिक जीवनात सर्व समाजासाठी कार्य केले असून त्या हिंदुत्वाच्या विचारासाठी सातत्याने कार्यरत आहेत.
मेधाताईंनी कधीही त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांकडे जातीय दृष्टिकोनातून पाहिलेले नाही किंवा समाजामध्ये भेदभावाची भूमिका घेतलेली नाही. आज कोणत्याही लोकप्रतिनिधीला निवडून येण्यासाठी सर्व समाजाच्या पाठिंब्याची आवश्यकता असते आणि त्यामुळे समाजात एकात्मतेचा संदेश जाणे अधिक महत्त्वाचे आहे.
अशा परिस्थितीत श्री. अभिमन्यू पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे केवळ नेत्यांमध्येच नव्हे तर समाजामध्येही चुकीचा संदेश जाण्याची शक्यता निर्माण होते. अशा प्रकारच्या घटनांचे परिणाम विविध समाजघटकांना, विशेषतः ब्राह्मण समाजालाही, भोगावे लागू शकतात.
मेधाताई कुलकर्णी या जातीने ब्राह्मण असल्या तरी त्या सर्व समाजाच्या नेत्या आहेत आणि त्यांनी आपल्या कार्यातून ते वेळोवेळी सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत अशा प्रकारची वक्तव्ये होणे हे अत्यंत दुर्दैवी आणि दुःखदायक असल्याचे डॉ. बोधनी यांनी नमूद केले आहे.
यापुढील काळात अशा प्रकारच्या वक्तव्यांबाबत सर्वच राजकीय नेत्यांनी संयम आणि जबाबदारीची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करताना विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून समाजात ऐक्य आणि समन्वय वाढविण्याचे कार्य होईल, अशी अपेक्षा असल्याचे समस्त ब्राह्मण समाज पुणे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. बोधनी यांनी म्हटले आहे.
