चिंचवड पुणे दि.२६ जून (सिटीनामा वृत्तसेवा)
ज्ञान, जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर यशाची शिखरे गाठणाऱ्या डॉ. पार्थ नंदकुमार सोळवंडे यांनी एम.बी.बी.एस. ही वैद्यकीय पदवी संपादन करून आपल्या कुटुंबाचा, समाजाचा आणि परिसराचा अभिमान उंचावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाचा गौरव म्हणून मातंग साहित्य परिषद यांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.समरसता गतिविधी, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याचे संयोजक सोपान कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. पार्थ यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. हा सत्कार केवळ एका विद्यार्थ्याच्या यशाचा नव्हे, तर ध्येयपूर्तीसाठी अविरत झटणाऱ्या तरुणाईच्या जिद्दीचा गौरव होता.
डॉ. पार्थ यांनी आपल्या बुद्धिमत्ता, सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रमाच्या बळावर शासकीय (Government Quota) प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच फेरीत पुणे येथील वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविला होता. त्यांचा हा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
त्यांच्या यशामागे कुटुंबीयांचे संस्कार आणि शिक्षणाची समृद्ध परंपरा आहे. त्यांचे वडील स्वर्गीय नंदकुमार सोळवंडे हे आदर्श शिक्षक म्हणून समाजात मानाचे स्थान प्राप्त केले होते, तर आई डॉ. हेमलता सोळवंडे या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान त्या देत आहेत.
यावेळी मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांनी डॉ. पार्थ यांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना, “समाजातील तरुणांनी शिक्षणाच्या बळावर मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती जिद्दीने पूर्ण करावीत. डॉ. पार्थ यांचे यश हे समाजासाठी प्रेरणेचा दीपस्तंभ आहे,” असे गौरवोद्गार काढले.
या सत्कार समारंभास डॉ. पार्थ यांचे मित्रमंडळ आणि मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांच्या उज्ज्वल वैद्यकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
डॉ. पार्थ सोळवंडे यांचे यश हे केवळ वैयक्तिक यश नसून, शिक्षण, संस्कार आणि अथक परिश्रम यांच्या सामर्थ्याचा प्रेरणादायी सत्कार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
