पतितपावन ते सहभोजन: समरसतेचा व्यवहार्य मार्ग: पद्मश्री दादा इदाते

Share this News

 -पतित पावन मंदिर हे सामाजिक बेड्या तोडून समतेवर उभा राहणाऱ्या नव्या भारताचे प्रतीक : पद्मश्री गिरीश प्रभुणे                पुणे दि.२३ (सिटीनामा वृत्तसेवा)                                   “ एकात्मता आणि समरसतेची संकल्पना ही आपल्या देशाला श्रेष्ठ बनविण्याची आहे. प्राचीन काळापासून संत, समाजसुधारक आणि महापुरुषांनी समाजातील भेदाभेद दूर करून बंधुभावाचा संदेश दिला. या परंपरेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सामाजिक कार्य विशेष उल्लेखनीय ठरते.सावरकरांनी हिंदू समाज संघटित करण्यासाठी केवळ विचार मांडले नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीतून समरसतेचा मार्ग दाखविला. १९३१ मध्ये रत्नागिरी येथे स्थापन केलेले पतित पावन मंदिर सर्व हिंदूंना जातिभेद न करता ते खुले केले. त्या काळात एका जातीच्या मंदिरात दुसऱ्या जातीला प्रवेश नव्हता; महारांच्या मंदिरात चर्मकारांना आणि चर्मकारांच्या मंदिरात महारांना प्रवेश नाकारला जात होता. अशा परिस्थितीत सावरकरांनी परस्पर मंदिरप्रवेश घडवून आणून सामाजिक ऐक्याचा धाडसी प्रयोग साकारला.पतितपावन मंदिराच्या भूमिपूजनावेळी शंकराचार्यांचा सत्कार एका तथाकथित अस्पृश्य समाजातील व्यक्तीकडून करण्यात आला, तसेच धर्माजी महारांनी केलेल्या कीर्तनावेळी ब्राह्मणांपासून सर्व जातींचे लोक त्यांच्या चरणी नतमस्तक झाले.ही त्या काळातील सामाजिक क्रांतीची ज्वलंत उदाहरणे होती.याशिवाय सहभोजनाचे कार्यक्रम, सावरकरांच्या पत्नींकडून आयोजित हळदी-कुंकू समारंभ, तसेच अनुयायांनी घेतलेले झुणका-भाकर सत्यनारायणाचे सामूहिक कार्यक्रम—या सर्व उपक्रमांतून सामाजिक भिंती पाडण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न दिसून येतो. समता ही केवळ भाषणांत नव्हे, तर व्यवहारात उतरावी, हा त्यामागचा स्पष्ट हेतू होता.”असे प्रतिपादन पद्मश्री दादा इदाते यांनी केले.
ज्ञानज्योती मुक्ता साळवे बहुउद्देशीय समाजसेवा संस्था संचालित मातंग साहित्य परिषद पुणे यांचे वतीने पतीतपावन मंदिर वर्धापन दिनानिमित्य व संत रोहिदास महाराज जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे पुण्यतिथी,राजे उमाजी नाईक पुण्यतिथी निमित्ताने पुणे महानगरपालिकेचे वीर बाजी पासलकर स्मारक येथे ‘महापुरुषांच्या विचारातून समता आणि समरसतामय राष्ट्राकडे’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी भटके विमुक्त आयोग भारत सरकारचे मा.अध्यक्ष पद्मश्री दादा इदाते होते.पुढे ते म्हणाले “समरसता म्हणजे केवळ भेदाभेदांचा अभाव नव्हे; ती परस्पर सन्मान, सहभाग आणि बंधुभावाची जाणीव आहे. समाजातील प्रत्येक घटकाला समान मान देऊन, एकत्र येऊन राष्ट्रनिर्मिती करणे हा समरसतेचा खरा अर्थ आहे.आज आपला देश अधिक श्रेष्ठ, सशक्त आणि एकात्म बनवायचा असेल, तर समरसतेचा मार्ग स्वीकारणे अत्यावश्यक आहे. विचार, आचार आणि व्यवहार यांतून एकात्मतेचे दर्शन घडले, तरच राष्ट्र उन्नत आणि अभेद्य बनेल.”
.तर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी बीजभाषण केले त्यांनी आपल्या बीजभाषणात म्हणाले की,” एकीकडे वंचित आणि मागास घटकांना मंदिर प्रवेश नाकारला व स्मशानभूमीतील अधिकार नाकारले गेले, त्यामुळे समाजात भेदभावाच्या भिंती उभ्या राहिल्या; तर दुसरीकडे हिंदू समाजाअंतर्गत समता व समरसता प्रस्थापित करण्यासाठी काहींनी प्रामाणिक प्रयत्नही केले.ही वस्तुस्थिती आहे.एक अशा मंदिरामध्ये सर्वांना प्रवेश मिळाला पाहिजे आणि हिंदू समाजातील सामाजिक विषमता दूर झाली पाहिजे .बेड्या तुटल्याशिवाय समाजात समता, ऐक्य आणि राष्ट्रबळ निर्माण होऊ शकत नाही. पतित म्हणजे अज्ञानामुळे मागे राहिलेला मानव. भगवद्गीतेच्या तत्त्वानुसार प्रत्येक मनुष्य ज्ञानानेच उन्नत होतो. परमेश्वराच्या दारी येणारा प्रत्येक जण पावन होतो.ही व्यापक मानवतावादी संकल्पना या मंदिरामागे होती.पतित पावन मंदिर हे केवळ देवस्थान नसून सामाजिक बेड्या तोडून समतेवर उभा राहणाऱ्या नव्या भारताचे प्रतीक आहे.त्यामुळे सामाजिक सुधारणा ही राष्ट्रनिर्मितीची पूर्वअट मानली गेली.याच भूमिकेतून सावरकरांनी पतित पावन मंदिर उभारले.” यावेळी श्री हेमंत हरहरे , अक्षय जोग, विलास लांडगे प्रा.विनोद सूर्यवंशी, ॲड. आनंद गवळी,शरद शिंदे,सुरेश महाले,डॉ.प्रसाद खंडागळे, क्षितीज गायकवाड, आनंद रिठे,सुनिल खंडागळे, राजेश रासगे , भास्कर केळकर व मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक /अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे सह अदी मान्यवर उपस्थित होते
या परिसंवादात अक्षय जोग आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की,”१९३१ मध्ये पतित पावन मंदिर सर्व हिंदूंना खुले करण्यात आले. वीर सावरकरांच्या प्रेरणेने व भागोजी कीर यांच्या आर्थिक पाठबळामुळे हे मंदिर उभे राहिले. पूर्वास्पृश्यांसह सर्व जातींच्या प्रतिनिधींचा न्यास असलेले हे मंदिर सांघिक पूजेच्या माध्यमातून समतेचा मार्ग दाखवणारे ठरले.यानंतर सावरकरांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ५०० पारंपरिक मंदिरे सर्व हिंदू जातींसाठी खुली केली. दोन जन्मठेपांची कठोर शिक्षा भोगूनही न डगमगणारे सावरकर पूर्वास्पृश्यांच्या मंदिरप्रवेशासाठी गीत लिहिताना मात्र भावनिक झाले होते.” या परिसंवादाचे वक्ते विलास लांडगे म्हणाले “ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम, संघटनशक्ती आणि धर्मनिरपेक्ष न्यायदृष्टीतून स्वराज्य उभे राहिले; त्यांच्या आदर्शातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ,आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे, उमाजी नाईक, चापेकर बंधू व विनायक दामोदर सावरकर यांसारखे क्रांतिकारक घडले.
या सर्वांनी समाजपरिवर्तन व समरसतेसाठी कार्य करून राष्ट्राला नवी दिशा दिली.” तर प्रा विनोद सुर्यवंशी म्हणाले की “ छ.शाहू महाराज यांनी माणगाव परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना “विद्वानात भूषण” म्हणत ‘पंडित’ पदवी देण्यास हरकत नसल्याचे गौरवोद्गार काढले. १९३१ मध्ये पतितपावन मंदिराच्या उद्घाटनावेळी विनायक दामोदर सावरकर यांनी जन्मावर आधारित ब्राह्मणत्व नाकारले. तसेच आद्यक्रांतिगुरु लहुजी साळवे यांनी देशसेवेची शपथ घेत विविध समाजघटकांतील शिष्यांना घडवले.यावरून ज्ञान व गुणवत्ता यावर कोणाचीही मक्तेदारी नसून व्यक्तीची ओळख तिच्या कर्म व गुणांवरूनच व्हावी, हा समान विचार स्पष्ट होतो.”
या प्रसंगी अॅड आनंद गवळी म्हणाले यांच्या “बेगमपुरा” संकल्पनेत समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव यांचे क्रांतिकारी तत्त्व मांडले आहे. सर्वांना अन्न, समान हक्क आणि भेदभावमुक्त समाज ही त्यांची भूमिका होती.याच विचारांचा प्रभाव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर पडला; म्हणूनच त्यांनी “The Untouchables” हा ग्रंथ रविदासांना अर्पण केला.संत रविदासांच्या विचारांचे प्रतिबिंब भारतीय संविधानातील समानतेची तत्त्वे (कलम 14 ते 18) आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या तरतुदींमध्ये (कलम 21 ते 26) स्पष्टपणे दिसते.”
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.धनंजय भिसे म्हणाले ,”महापुरुषांचे विचार हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नाहीत; ते वर्तमान आणि भविष्य घडविणारे दीपस्तंभ आहेत. त्यांच्या शिकवणीचा अंगीकार करून आपण समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारित समरसतामय राष्ट्र उभारू शकतो.समतेतून स्वाभिमान आणि समरसतेतून राष्ट्रबांधणी — हाच महापुरुषांच्या विचारांचा खरा वारसा आहे. समता ही राष्ट्राचा ‘आत्मा’ आहे आणि समरसता हे राष्ट्राचे ‘सौंदर्य ‘आहे.”
कार्यक्रमाचे आभार डॉ.माणिक सोनावणे यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *