*भव्य मिरवणूक,प्रेरणादायी व्याख्यान* चिंचवड दि.१८ (सिटीनामा वृत्तसेवा)
छत्रपती शिवरायांचे प्रेरणादायी कार्य हे अजरामर असून आपण सर्वांनी या जाज्वल्य इतिहासाची जाणीव ठेवून प्रत्येकाने राष्ट्रभक्ती जोपासली पाहिजे असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज या इंग्रजी पुस्तकाचे लेखक, सामाजिक कार्यकर्ते, रा.स्व.संघाचे जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना केले. ते दि.१८ फेब्रुवारी रोजी गहुंजे – मामूर्डी भागातील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित भव्य शिवजयंती कार्यक्रमात बोलत होते त्यांनी छत्रपतींच्या प्रेरणादायी कथेतून महाराजांच्या शौर्य, धैर्य आणि नेतृत्वाची माहिती दिली. यावेळी ज्ञानश्री शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ब्लूमिंग शाळेचे खजिनदार व विद्याभारती पुणे जिल्हा सहमंत्री साहेबराव बोडके, व्यवस्थापिका सौ. पौर्णिमा बोडके, शाळेच्या मुख्याध्यापिका विजिला राजकुमार प्रामुख्याने उपस्थित होत्या.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जोशपूर्ण पोवाडा, शिवस्तुती आणि गीते सादर केली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज,पारंपारिक मावळ्यांची वेशभूषा साकारली. तत्पूर्वी ढोल ताशा व लेझिमच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. ब्लूमिंग इंटरनॅशनल परिसरातील नामांकित शाळा असून याठिकाणी शैक्षणिक गुणवत्ता, खेळ यासह विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविधांगी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन तसेच महापुरुषांच्या विचारांचा जागर शाळेतर्फे कायमच करण्यात येतो. भारतीय संस्कृती,सण उत्सवांचे महत्व देखील विविध कार्यक्रमातून शाळेत सांगितल्या जाते. ब्लूमिंग शाळेत विद्यार्थांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच खेळाकडे देखील विशेष लक्ष दिल्या जाते, शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धामध्ये प्राविण्य मिळाले आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संस्कार व देशभक्ती वाढते असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सादरकरणाचे मान्यवरांनी विशेष कौतुक करून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.कार्यक्रम यशस्वितेसाठी ब्लूमिंग शाळेच्या शिक्षक – कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.


