पंढरपूर दि.२८ मे (सिटीनामा वृत्तसेवा)
वीरशैव लिंगायत समाजात जनजागृती हेतू व आगामी राष्ट्रीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर, पंढरपूर आणि परिसरात झालेल्या विविध बैठकींत धर्माच्या रकान्यात “हिंदू” अशीच नोंद करण्याचा एकमुखी निर्धार विविध बैठकीतून व्यक्त करण्यात आला. समाजातील विविध ज्ञाती संस्था, मठाधिपती, शिवाचार्य, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकींमध्ये जनगणनेतील नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सोलापूर येथील शिवस्मारक येथे झालेल्या प्रमुख बैठकीत प्रत्येक वीरशैव लिंगायत नागरिकाने धर्माच्या रकान्यात “हिंदू” अशी नोंद करावी आणि त्यानंतर जाती व पोटजातीचा उल्लेख करावा, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. समाजाची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख अबाधित ठेवण्यासाठी अचूक नोंदणी आवश्यक असल्याचे मान्यवरांनी यावेळी स्पष्ट केले.

बैठकीला सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे, हेमंतराव हरहरे, प्रा. गजानन धरणे, महादेव न्हावकर, अण्णाराया बिरादार, गुरुराज चरंतिमठ यांच्यासह विविध समाज प्रतिनिधी उपस्थित होते. याशिवाय राजशेखर हिरेहब्बू यांच्या निवासस्थानीही स्वतंत्र बैठक घेण्यात आली. वीरशैव लिंगायत जंगम समाज तसेच शिवशिंपी समाजाच्या बैठकीतही “आम्ही सारे हिंदूच” हा निर्धार पुन्हा व्यक्त करण्यात आला.
पंढरपूर येथे हिंदू वीरशैव लिंगायत मंचच्या बैठकीत समाजबांधवांना जनगणनेतील नोंदीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. धर्माच्या रकान्यात “हिंदू” आणि जातीच्या रकान्यात संबंधित पोटजात नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले. समाजात जनजागृती वाढविण्यासाठी पुढील काळात व्यापक प्रचार मोहीम राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला.
जिल्हा संयोजक चिदानंद मुस्तारे, मनोज हिरेहब्बू, सतीश जरांकली, सुरेखा होळीकट्टी, अंबिका पाटील, सचिन विभुते, अजित पांढरे, राहुल पावले आणि सतीश तमशेट्टी यांनी बैठका आणि जनजागृती अभियानासाठी परिश्रम घेतले.
समाजाने संघटित राहणे गरजेचे
“जनगणना ही केवळ नोंदणी प्रक्रिया नसून समाजाच्या ओळखीशी संबंधित विषय आहे. धर्माच्या रकान्यात ‘हिंदू’ आणि जातीच्या रकान्यात संबंधित पोटजात नमूद करण्याबाबत समाजात जनजागृती केली जात आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील समाजबांधवांनी संघटित राहून प्रत्येक कुटुंबापर्यंत हा संदेश पोहोचविणे आवश्यक आहे.
-दानेश तिमशेट्टी
हिंदू वीरशैव लिंगायत मंच सहसंयोजक
