पिंपरी दि.६ (सिटीनामा वृत्तसेवा)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर शहराचे प्रथम नागरिक रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत प्रभाग क्र.१६ मधून मताधिक्याने विजयी झालेल्या शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांच्या अनोख्या ‘किवळे पॅटर्न’ने लक्ष वेधून घेतले होते. प्रभाग १६ मधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी ‘किवळे पॅटर्न’ नावाचे फेटे परिधान करून पालिकेत आल्याने त्यांची आगळीवेगळी एंट्री चर्चेचा विषय ठरली. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्र.१६ (किवळे – रावेत – गुरुद्वारा – मामुर्डी) भागातील शिवसेनेचे शहरप्रमुख नीलेश तरस, सौ.रेश्मा बापू कातळे, सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी
मोठ्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या उमेदवारांचा पराभव केला होता. त्यावेळी सुद्धा या भागातील किवळे पॅटर्न शहरात चर्चेचा विषय ठरला होता. भविष्यात देखील किवळे पॅटर्न परिसरातील विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे नगरसेवकांनी सांगितले. यावेळी युवा नेतृत्व बापूसाहेब कातळे, शिवसेनेचे पदाधिकारी राजेंद्र तरस देखील उपस्थित होते.
