पुनरुत्थान गुरुकुलम विशेष पुरस्काराने सन्मानित

Share this News

चिंचवड दि.२७ जानेवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलमला विशेष कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धतीकरिता मध्यप्रदेश शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहनजी यादव यांच्या हस्ते व मा.राज्यपाल मंगूभाई पटेल यांच्या उपस्थितीत गुरुकुलमचे पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, प्रधानाचार्य पूनम गुजर यांचा विशेष गौरव करण्यात आला. भोपाळ येथे दि २६ जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार राशी रुपये दहा लक्ष प्रदान करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या पुरस्काराबद्दल क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती सर्व पदाधिकारी, सदस्य व गुरूकुलमच्या सर्व आचार्य व विद्यार्थांचे सर्वांनी कौतुककेले.     

 काय आहे समरसता गुरुकुलम ?                          

जेष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री श्री गिरीशजी प्रभुणे यांचा सामाजिक कार्य करतांना फासे-पारधी, कोल्हाटी, डोंबारी, लमाण, नंदीवाले, मरीआईवाले, गोंधळी, वासुदेव इ. समाजाच्या लोकांशी संपर्क आला. परंपरागत अंगभूत कला अवगत असलेले हे लोक शिक्षणापासून मात्र वंचित आहेत असे लक्षात आल्यावर त्यांच्या या कलागुणांसोबतच शिक्षण देखील द्यायची गरज लक्षात आली. त्यांच्यासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक प्रकल्प राबवले गेले. शिक्षण देऊनही काही मुलं बेरोजगार आहेत. शिक्षणामुळे त्यांच्यातले नैसर्गिक ज्ञान जसे की, औषधी वनस्पतीची नाव व उपयोग इ. ज्ञान मात्र ते विसरलेत. मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या अंगात असलेले उपजत गुणदेखील निपजले पाहिजेत म्हणून, पारंपारिक गुरुकुल पद्धतीचा शोध घेण्यासाठी गुरुकुल पद्धतीनेच मुलांना शिक्षण द्यायचे ध्येय ठेऊन पुण्याजवळ चिंचवड येथे पुनरुत्थान – समरसता – गुरुकुलम संस्थेची स्थापना व सुरुवात झाली. जी मुलं भटकत राहतात त्यांच्यासाठी गुरुकुलम सुरु केलं गेलं. १ ली ते १२ वी इयत्तेत इथे मुलं शिकतात. प्रामुख्याने वडार-पारधी-कष्टकरी वर्गातील ही मुले असून ५ वी ते ९ वी च्या मुलांना पारंपारिक शिक्षणाबरोबरच विविध कौशल्य प्रशिक्षण देखील दिलं जातं. जसे की, शेती-भाजीपाला लागवड, कंपोस्ट खत, रोपवाटिका, बांधकाम, सायकल व मोटरसायकल दुरुस्ती, प्लंबिंग, रंगकाम, कुंभारकाम इ. बरोबरच गायन, वादन, चित्रकला, लेखन, वाचन, संगणक इ. एकूण २० विभागात मार्गदर्शन केले जाते. वनौषधी, पक्षी निरीक्षण, खगोल निरीक्षण यांचाही अभ्यास घेतला जातो. याशिवाय नैपुण्य गटात विविध खेळांचे मार्गदर्शन केले जाते. आणि हे सर्व अनौपचारिक शिक्षणाच्या पद्धतीद्वारे शिकवले जाते. मूळच्या कला-कौशल्य गुणांचा विकास आणि दुर्गुणांचा ऱ्हास, आधुनिक आणि पारंपरिक ज्ञानाची सांगड घालून येथे शिक्षण दिले जाते. मुले इथेच रहात असल्यामुळे हे शक्य होते. दुपारी २.३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुलं ही वेगवेगळी कौशल्य शिकतात. एकूणच मुलांच्या मनाचा कल लक्षात घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करायचा आणि आधुनिक काळाला सुसंगत असे त्यांना इथे घडवले जाते या गुरुकुलमला भेट दिल्यास नक्कीच नवी दिशा व प्रेरणा मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *