अजितदादा जनतेचे नेते – पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली; महाराष्ट्र सुन्न; अजितदादांवर उद्या सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार

Share this News

तीन दिवसांचा शासकीय दुखवटा

अजितदादा जनतेचे नेते – पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली

दिलदार व दमदार मित्र गमावला – मुख्यमंत्री फडणवीस

दि.२८ जानेवारी (सिटीनामा वृत्तसेवा)

पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकाली निधन झाले. या दुःखद घटनेनंतर महाराष्ट्र राज्य शासनाकडून तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालय बंद होती. २८ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ पर्यंत सर्व शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येईल. या दुखवट्याच्या काळात कोणतेही अधिकृत शासकीय करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत असे कळविण्यात आले आहे.

पंतप्रधानांची श्रद्धांजली –
आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,
“अजित पवार हे खऱ्या अर्थाने जनतेचे नेते होते. तळागाळातील लोकांशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे नाते होते. महाराष्ट्राच्या जनतेसाठी अखंडपणे कार्य करणारे, कष्टाळू आणि प्रशासकीय बाबींमध्ये प्रगल्भ समज असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा मोठा आदर केला जात होता. गरीब, वंचित आणि दलित घटकांना सक्षम बनवण्याची त्यांची बांधिलकी उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली जाणे अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य समर्थकांप्रती माझ्या संवेदना. ओम शांती.”

अजितदादा महाराष्ट्रातील लोकनेते होते महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेले नेते होते अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात त्यांचं अकाली जाणं हे अविश्वसनीय आहे मनाला चटका लावणारे आहे दिलदार व दमदार मित्र सोडून गेल्याचे मनाला खूप दुःख झाले. पंतप्रधान व गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या घटनेची कल्पना दिली आहे त्यांनी ही प्रचंड दुःख व्यक्त केले आहे. संपूर्ण देशात या घटनेमुळे हळहळ पसरली असून अपरिमित हानी झाल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले गेल्या तीन दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेल्या अजित दादांच्या निधनाने अतिशय मोठे नेतृत्व गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली . त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून राजकीय क्षेत्रासह अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी नेत्यांनी बारामतीकडे धाव घेतली आहे, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आपापली प्रतिष्ठाने बाजारपेठा बंद ठेवून सर्वसामान्यांनी दादांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करीत श्रद्धांजली अर्पित केली.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्यावर उद्या २९जानेवारी २०२६ रोजी त्यांच्या कर्मभूमीत बारामती येथे शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या दुःखदप्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राजकीय वर्तुळातील अनेक नेते मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.

राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बारामतीत पोहोचले..

राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *