मुंबई दि.१२ (सिटीनामा वृत्तसेवा)
महाराष्ट्रात लवकरच सुमारे ७० हजार पदांची मोठी नोकरभरती प्रक्रिया राबवण्यात येणार असून नव्या पद्धतीने ही पदभरती होणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे.
सदर भरती नव्या, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या भरतीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या सुमारे 20 हजार पदांचा समावेश देखील असणार आहे तर उर्वरित पदे आयोगाबाहेरील विविध विभागांमध्ये भरली जाणार आहेत.
भरती प्रक्रियेत आवश्यक कौशल्ये, पात्रता निकष आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेतले जातील, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सेवा प्रवेश नियमावलीतील बदलांचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाणार आहे.
पदभरती पारदर्शक आणि डिजिटल प्रक्रियेद्वारे होणार आहे यामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि डिजिलॉकर प्रणालीचा वापर करून प्रमाणपत्र पडताळणी सुलभ करण्यात येईल त्याचबरोबर पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाइन पडताळणी शक्य असल्यास, इतर प्रक्रियांमध्येही हे मॉडेल वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या.
राज्य प्रशासनात येणार गती
राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये पदे भरल्यानंतर प्रशासनाच्या कार्यक्षमतेत मोठी वाढ होईल. भरती प्रक्रियेत कोणताही पक्षपात किंवा अन्याय होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रणाली पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले. तरुणांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी स्वच्छ, वेगवान आणि तंत्रज्ञानाधारित भरती प्रणाली उभारण्यावर शासनाचा भर असल्याचेही त्यांनी सांगितले.
