हिंदूंमध्ये जातीपातीचे विष कालवणाऱ्यांना धडा शिकवा – सुनील देवधर

Share this News

शाहूनगर / चिंचवड (पुणे) दि.९ एप्रिल (सिटीनामा वृत्तसेवा)
हिंदूंमुळेच भारतात संवैधानिक मूल्यांचे संरक्षण झाले असून पुढेही होत राहील त्यामुळे इथला सकल हिंदू सुरक्षित राहणे गरजेचे आहे.काँग्रेस नेतृत्वाने हिंदूंमध्ये भेदभाव करून कायम फूट पाडण्याचे काम केले. मतांसाठी लांगूलचालन करणाऱ्या,
जातीपातीचे विष कालवणाऱ्यांना धडा शिकवून हिंदू एकतेसाठी वज्रमूठ घट्ट करूया असे आवाहन जेष्ठ भाजपा नेते, माजी राष्ट्रीय सचिव, माय होम इंडियाचे संस्थापक, प्रखर व्याख्याते सुनील देवधर यांनी केले ते शाहूनगर चिंचवड येथे आयोजित विराट हिंदू संमेलनात बोलत होते.
व्यासपीठावर सुप्रसिद्ध लेखक डॉ.गिरीश आफळे, ह.भ.प.पूनम ताई जाचक, संयोजन समिती अध्यक्ष प्रदीप नागणे, उपाध्यक्ष सौ.कल्पना पठारे उपस्थित होत्या.

पुढे बोलतांना देवधर म्हणाले, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी या व्यक्तिमत्वाने भारताच्या महापुरुषांच्या विचारांचा जागर करीत त्यांचा आदर्श घेत सकल हिंदूंमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आहे. इंग्रजांचा झेंडा काढून छत्रपतींची राजमुद्रा नौदलावर लावली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आमच्यापुढे आहे त्यामुळे कधीही आम्ही क्रांतीकरांचे बलिदान विसरणार नाही असा ठाम विश्वास आपल्या नेतृत्वाला आहे. स्वातंत्र्यानंतर फक्त सत्तेसाठी,मतांसाठी तत्कालीन सरकारांनी कायम लांगूलचालन केले अशांना कायम धडा शिकवला पाहिजे. “होय! हे हिंदुराष्ट्र आहे!” असे ठामपणे सांगणारे संघस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाच्या माध्यमातून संपूर्ण हिंदूंना संघटित करण्यासाठी शाखा हा मंत्र दिला. हिंदुत्व जागरणांचे अनेक उपक्रम संघप्रेरित संस्था करत असल्याचेही अधोरेखित केले. भारत आता प्रचंड मोठ्या दिशेने झेप घेत असून महाराष्ट्रासह देशातून नक्षलवाद हद्दपार होत आहे ही गोष्ट अभिनंदनीय असल्याचे अधोरेखित केले. आपल्या आशिर्वचनपर संबोधित करतांना ह.भ.प.पूनमताई जाचक यांनी महिलांनी जागृत होण्याची गरज असून लव जिहाद सारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपली हिंदू संस्कृती, संस्कार जपण्याचे आवाहन केले. पंचपरिवर्तन विषय मांडणी करतांना सुप्रसिद्ध लेखक डॉ.गिरीश आफळे यांनी कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता, नागरी शिष्टाचार, स्व बोध या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, नगरसेविका अनुराधा गोरखे,सौ.सुप्रिया चांदगुडे, कुशाग्र कदम उपस्थित होते. कार्यक्रमात सांस्कृतिक वार्तापत्राच्या संघ यात्रा या विशेषांकाचे प्रकाशन झाले. संमेलनस्थानी भारतीय विचार साधना पुस्तकांचे प्रदर्शन लागले होते या स्टॉल्स ला सुनील देवधर यांनी उपस्थित मान्यवरांसह भेट दिली.

संमेलनात उपस्थित महिलांनी भारतमातेची महाआरती केली.
परिसरातील महिलांची संख्या लक्षणीय होती, भव्य आरतीच्यावेळी दिव्यांच्या प्रकाशाने परिसर तेजोमय झाला होता हे दृश्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार मांडगे, सूत्रसंचालन सौ. प्रीति वाघोलीकर यांनी तर आभार अजित भालेराव यांनी मानले. यशस्वितेसाठी पंकज दलाल, वैभव वाघोलीकर, अजित भालेराव, संदीप पोलकम, शुभम चौधरी, मधुसूदन जोशी,सेवासारथी संस्था, आधार महिला मंडळ यांचेसह सकल हिंदू संमेलन आयोजन समिती शाहूनगर सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *