मध्य महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा

Share this News

मुंबई दि.३१ मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)
भारतीय हवामान खात्याच्या दि.३० मार्च २०२६ च्या पाच दिवसाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वीज चमकणे, गारपीट सह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.आज पुण्यासह अनेक भागात सकाळपासून ढगाळ वातावरण दिसून येत आहे.
नाशिक,अहिल्यानगर,पुणे,सातारा,कोल्हापूर,सांगली,धुळे,जळगाव,छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर या जिल्ह्यांसह काही भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.काही भागांत पावसाची रिपरिप सुरु झाली आहे.

सोमवार दि.३० मार्च रोजी झालेल्या वादळी अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून रस्ते जलमय झाले होते. काही भागात घरावरील पत्रे उडून काही नुकसानीच्या घटना देखील घडल्या. गारपिटीमुळे आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून किमान तापमानात घट झाल्याचे दिसून आले. आज सकाळी लोहगाव आणि मगरपट्टा येथे सर्वाधिक २६.३ अंश सेल्सिअस कोरड्या तापमानाची नोंद झाल्याची माहिती आहे.हवामान खात्याच्या नोंदीनुसार, पुणे शहरातील पाषाणमध्ये पुणे परिसरातील सर्वाधिक ४६.८ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे.

नागरिकांनी सतर्कतेसाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *