– भाजपाचे रवी लांडगे होणार शहराचे महापौर
पिंपरी दि.२ फेब्रुवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज दि.२ फेब्रुवारी रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी रवी बाबासाहेब लांडगे यांचे नाव निश्चित करून तसे पत्र जिल्हाध्यक्ष शत्रूघ्न बापू काटे यांच्याकडे सोपवले त्यानंतर प्रभाग क्र.६ मधून बिनविरोध निवडून आलेले भाजपाचे नगरसेवक रवी लांडगे यांचे महापौर पद निश्चित झाले आहे.
उपमहापौर पदासाठी वेळेवर गडबड
याच पत्रात उपमहापौर पदासाठी चिंचवड विधानसभेतील प्रभाग क्र.१९ चे नगरसेवक शीतल शिंदे यांचे नाव निश्चित केले होते. प्रदेशाध्यक्षांचे पत्र जिल्हाध्यक्षांना प्राप्त होताच शिंदे हे पद स्वीकारतील असे वाटत असतानाच, त्यांनी “मला कोणतेही पद नको, मी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करेन,” अशी भूमिका घेऊन नाराजी व्यक्त करीत सर्वांना धक्का दिला.
नगरसेविका शर्मिला बाबर यांना लॉटरी
शीतल शिंदे यांच्या नकारानंतर भाजपच्या नगरसेविका शर्मिला राजू बाबर यांचे नाव जाहीर झाले असून त्यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्या प्रभाग १५ (जागा क) मधून विजयी झाल्या आहेत.

