दि.१२ (सिटीनामा वृत्तसेवा)
समस्त ब्राह्मण संघ, पुणे (महाराष्ट्र) यांच्या वतीने दि.१२ जानेवारी रोजी यमुना नगर येथील सीझन्स बँक्वेट हॉल येथे “शंभर टक्के मतदान का आवश्यक आहे” या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार वक्ते सुशील कुलकर्णी यांनी उपस्थित नागरिकांना सखोल मार्गदर्शन केले.
आपल्या भाषणात सुशील कुलकर्णी यांनी स्पष्टपणे सांगितले की, मतदान हा केवळ अधिकार नसून प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. मतदान करताना व्यक्ती, लिंग, जात, नातेसंबंध किंवा ओळखीपेक्षा विचारधारा आणि चिन्ह महत्त्वाचे असते, यावर त्यांनी भर दिला.
यावेळी त्यांनी ठाम शब्दांत सांगितले की,
“आपल्याला चारही ठिकाणी फक्त कमळच लक्षात ठेवायचे आहे.” नाव वेगवेगळी असतील, व्यक्ती वेगळ्या असतील; पण पाहायचे असेल तर चारही ठिकाणी एकच चिन्ह — कमळच पाहायचे आहे.”
ते पुढे म्हणाले की, देश व राज्य चालवण्याची जबाबदारी केवळ केंद्र किंवा राज्य सरकारवर न ठेवता स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनही योग्य विचारधारेचे प्रतिनिधी निवडून देणे अत्यंत आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट झाले तरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक मजबूत होतील, आणि यासाठी महाराष्ट्रातील नगरपालिका निवडणुका निर्णायक ठरतात.
आपल्या भाषणात त्यांनी प्रभावी रूपक वापरत सांगितले की,
लोकांना भ्रष्ट करणाऱ्या व दिशाभूल करणाऱ्या नेतृत्वाचे इंजिन कधीही रूळ किंवा पटरी सोडू शकते.
अशा अनिश्चित इंजिनावर विश्वास न ठेवता स्थैर्य, विकास आणि विश्वासाचे प्रतीक असलेल्या कमळावरच समाजाने विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.
याच संदर्भात त्यांनी ठामपणे नमूद केले की,
“आज ही वेळ श्राद्धाची नाही — ही वेळ युद्धाची आहे.”
लोकशाहीतील हा निर्णायक संघर्ष असून, संभ्रम किंवा वैयक्तिक गणिते न करता चारही ठिकाणी कमळालाच मतदान करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रभाग क्रमांक १३ मधील बापू घोलप,
सौ. अर्चना कारांडे,
सौ. मनीषा कुलकर्णी
आणि उत्तम केंजळे
या चारही उमेदवारांना समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने आमंत्रित करण्यात आले होते.
समस्त ब्राह्मण संघाच्या वतीने कैलास शर्मा, सचिन टापरे, सौ. स्मिता येवलेकर तसेच इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी या चारही उमेदवारांना पाठिंब्याचे पत्र व जाहीर पाठिंबा प्रदान केला. यावेळी केवळ ब्राह्मण समाजानेच नव्हे तर सर्व समाजघटकांनी समान विचारधारेला आणि या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, अशी विनंती करण्यात आली.
कार्यक्रमात बोलताना उपस्थितांनी नमूद केले की, आमदार महेशदादा लांडगे हे पिंपरी-चिंचवडकरांच्या हितासाठी मोठा लढा उभा करत असून, त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही आजची गरज आहे. त्यामुळे या प्रभागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण पिंपरी-चिंचवडमध्ये कमळ फुलले पाहिजे, असा ठाम संदेश देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य कुलकर्णी यांनी केले.
भाजपचे पदाधिकारी गिरीश देशमुख यांनी यमुना नगर परिसरात भारतीय जनता पार्टीने आजवर केलेल्या विकासकामांची माहिती दिली.
कार्यक्रमास
भाजप प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी,
विश्व हिंदू परिषदचे श्री शरद इनामदार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या शेवटी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने अभय ओरपे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. सर्वांनी शंभर टक्के मतदान करण्याची शपथ घेत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

