नाशिक दि.७ (सिटीनामा वृत्तसेवा)
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाचे ६० वे हीरक महोत्सवी प्रदेश अधिवेशन स्वातंत्र्यवीर सावरकर नगर, डोंगरे वसतिगृह मैदान येथे ३ ते ५ जानेवारी दरम्यान संपन्न झाले. ३ जानेवारी रोजी अधिवेशनाचे उद्घाटन प. पू. जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते कॅबिनेट मंत्री मा. गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. विविध वैचारिक आणि संघटनात्मक सत्रांच्या माध्यमातून उपस्थित कार्यकर्त्यांचे प्रबोधन करण्यात आले. अधिवेशनादरम्यान संविधान ७५ : संविधानाची भारतीय दृष्टी या विषयावर ऑर्गनायजर चे संपादक प्रफुल्ल केतकर यांचे भाषण सत्र झाले यामध्ये संविधान हे भारतीय संस्कृती आणि परंपरेला अनुसरून असल्याने वक्तव्य केले, ‘स्वबोध’ या विषयावर अभाविपचे क्षेत्रीय संघटन मंत्री गितेश चव्हाण यांचे भाषण झाले तसेच विकसित भारतासाठी युवांची भूमिका या विषयावर रा.स्व.संघाचे क्षेत्र प्रचारक श्री.सुमंत आमशेकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
अधिवेशनात उभारण्यात आलेल्या स्व. रवींद्र सहस्त्रबुद्धे प्रदर्शनीमधून जनजाती जीवन व अभाविपच्या शैक्षणिक, सामाजिक व रचनात्मक कार्याचा प्रवास दृश्य स्वरूपात मांडण्यात आला. प्रदर्शनीचे उद्घाटन सुप्रसिद्ध उद्योजक वैभव जोशी व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्र कुलगुरु प्रा.जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या हस्ते करण्यात आले.
अधिवेशनात एकूण चार प्रस्ताव पारित करण्यात आले –
१) प्रस्ताव क्र. १ – राज्यातील विद्यापीठांनी घेतलेला कॅरी ऑन चा निर्णय तसेच विविध विद्यापीठांमधील शैक्षणिक वेळापत्रकातील अनियमितता दूरगामी नकारात्मक परिणाम करणारी..!
२) प्रस्ताव क्र. २ – भारतातील Gen Z ही राष्ट्रहित आणि सांस्कृतिक मूल्ये जपणारी, पंच परिवर्तनातून समाज परिवर्तन करणे आवश्यक…!
३) प्रस्ताव क्र. ३ – कुंभ परंपरा जपत, आयटी पार्क आणि शैक्षणिक उन्नतीच्या माध्यमातून नाशिकचा व्हावा शाश्वत विकास..!
४) प्रस्ताव क्र. ४ – स्क्रीन टाइम वाढणे हे युवकांच्या निरोगी आयुष्यासाठी मोठे आव्हान – स्क्रीन टाईम टू अँक्टिव्हिटी टाईम ही संकल्पना दैनंदिन जीवनात आत्मसात करणे आवश्यक..!
माहितीपर सत्राच्या माध्यमातून विद्यापीठ संरचना, खासगी विद्यापीठ संरचना, भारतीय उच्च शिक्षा आयोग, शुल्क निर्धारण समिती, विविध शिष्यवृत्ती आणि अधिछात्रवृत्ती योजना अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना शिक्षण प्रणालीतील विविध घटकांची माहिती देण्यात आली. या अधिवेशनाच्या निमित्ताने शहराच्या मध्यवर्ती भागातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध ३५ स्थानांवर संस्था, संघटना आणि व्यक्तींच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले. शोभायात्रेचा समारोप जाहीर सभेच्या माध्यमातून करण्यात आला. या जाहीर सभेत जनजाती समाजाचे भारताच्या जडणघडणीमध्ये सामाजिक सांस्कृतिक योगदान, महिला विमर्श, बांगलादेशी हिंदूंवरील वाढते अत्याचार आणि घुसखोरी तसेच नाशिकच्या पर्यावरण आणि कुंभमेळा तसेच राज्यातील विविध शैक्षणिक समस्यांवर भाषण करीत राज्य शासनाने लक्ष वेधण्यात आले. प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांनी परिषदेची पुढील ६ महिन्यांसाठीची आगामी दिशा अधिवेशनाचा समारोप प्रदेश संघटन मंत्री मीत ठक्कर यांनी केला, यावेळी हे अधिवेशन विद्यार्थी परिषदेच्या आगामी कार्याला गती देणारे ठरेल असे मत व्यक्त करण्यात आले. या अधिवेशनास नाशिक जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी दिल्या.
या अधिवेशनात एकूण ७ शासकीय जिल्ह्यातून आणि परिषद रचनेतील २३ जिल्ह्यातून, ७४ शाखांमधून १५४ महाविद्यालयांतून ५८८ विद्यार्थी, १६५ विद्यार्थिनी, २२ प्राध्यापक आणि १ अन्य असे एकूण ७७६ प्रतिनिधी उपस्थित होते.
