महासाधू श्रीमन मोरया गोसावींच्या माघी यात्रेला थाटात प्रारंभ
चिंचवड दि.२० (सिटीनामा वृत्तसेवा) लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पुणे – चिंचवड येथील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावींच्या मंगलमूर्ती माघी यात्रेचा चिंचवडगावातील मंगलमूर्ती वाडा येथून थाटात प्रारंभ झाला.
सोमवार दि.१९ रोजी आकर्षक फुलांनी सजवलेली मंगलमूर्तींची पालखी रथात विराजमान होऊन अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र मोरगाव कडे मार्गस्थ झाली. यावेळी चिंचवड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंदार महाराज देव, जितेंद्र महाराज देव, काळभैरवनाथ समितीचे सदस्य, नवनिर्वाचित नगरसेवक यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभात बँड पथकाच्या गजरात, मोरया मोरया जयघोषात पालखी सोहळा मार्गस्थ होत होता. सुरुवातील प्रमुख विश्वस्त यांनी मंगलमूर्ती वाडा तसेच श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी समाधी मंदिरात मंगलमूर्तींची विधिवत पूजा केली यावेळी त्यांच्यासह भाविकांनी श्रीमन महासाधू मोरया गोसावींच्या समाधी मंदिरातील सप्तमहापुरुषांचे दर्शन घेतले त्यानंतर पालखी सोहळा सुरू झाला.

असा असेल पालखी सोहळा –
पालखीचा सोमवारचा मुक्काम एकनाथ मंगल कार्यालयात झाला, मंगळवारी पहाटे पालखी सोहळा दिवे घाट मार्गे सासवडकडे मार्गस्थ झाला, तेथील कऱ्हाबाई मंदिरात मंदिरात दुसरा मुक्काम असेल त्यानंतर बुधवारी दि.२१ जानेवारी रोजी पालखी जेजुरी मार्गे श्री क्षेत्र मोरगाव येथे पोहचणार आहे. मोरगावला तीन दिवस मुक्कामी राहून शनिवार दि.२४ जानेवारी रोजी श्रीक्षेत्र थेऊरकडे मार्गस्थ होईल, मंगळवार दि.२७ जानेवारी रोजी श्रीक्षेत्र सिद्धटेक मुक्काम त्यानंतर परतीचा प्रवास करून २९ जानेवारी रोजी चिंचवड येथील घाटावर धुपारती होऊन श्रींच्या माघी यात्रेची सांगता होणार आहे.
श्री गणेशभक्तांमध्ये माघी यात्रेचे विशेष महत्व असल्याने भाविक मोठ्या श्रद्धेने या यात्रेत सहभागी होऊन मंगलमूर्तींची उपासना करतात. पालखी सोहळ्याचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे.
