किवळे/ पुणे दि.२३ मार्च (सिटीनामा वृत्तसेवा)
हिंदुत्व ही आपली जीवनपद्धती असून सकल हिंदूंनी आपली संस्कृती समजून घेऊन ती जोपासण्याचे आवाहन सुप्रसिद्ध सिनेअभिनेते, व्याख्याते व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी केले ते के विले सोसायटी समोरील आठवडी बाजार मैदानावर आदर्शनगर – बापदेवनगर भागात सकल हिंदू समाज किवळे आयोजित विराट हिंदू संमेलनात बोलत होते. यावेळी संस्कृती संवर्धन विकास महासंघाचे कार्याध्यक्ष योगाचार्य डॉ.अजित जगताप, घोरावडेश्वर प्रासादिक दिंडीचे ह.भ.प.मुकुंद नाना राऊत महाराज,इस्कॉन धाम रावेतचे जदभारत दास महाराज यांनी मार्गदर्शन केले.

पुढे बोलतांना योगेश सोमण यांनी विविध उदाहरणे देऊन जातीपाती विसरून हिंदू म्हणून एकत्रित येण्याची गरज विषद केली.आपण कायम इतिहासाची आठवण ठेवून भविष्याचा वेध घेतला पाहिजे. शिवछत्रपतींचे गडकिल्ले तसेच क्रांतिकारकांची स्मारकांना आपण दरवर्षी सहकुटुंब भेट देऊन प्रेरणा घेतली पाहिजे. तरुणांनी हिंदू धर्म संस्कृती जोपासण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असून महिला भगिनी,तरुणी यांनी हिंदू धर्म अस्मितेसाठी जागृत होऊन, हिंदू धर्माची खोटी शाल पांघरून फसविणाऱ्यांना वेळीच ओळखून सावध होण्याचा इशाराही त्यांनी दिला. योगाचार्य डॉ.अजित जगताप यांनी संस्कारी कुटुंबव्यवस्था मजबूत राष्ट्र बनवत असल्याचे सांगून मंदिरे ही संस्कार केंद्रे आहेत मंदिरांनी उत्तम शिक्षण देणाऱ्या शाळा काढायला हव्या असे आवाहनही केले. त्यांनी पर्यावरण, स्व भाषा, स्वभाषा, स्वभजन, स्वभ्रमण, सामाजिक समरसता या बाबींवर प्रकाश टाकला. घोरवडेश्वर प्रासादिक दिंडीचे ह.भ.प.मुकुंद नाना राऊत महाराज यांनी १६ संस्कारांपैकी एक महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार आहे. नव्या पिढीने विवाहाचा अर्थ समजून घेऊन आदर्श पती पत्नी होऊन संस्कारी कुटुंब उभे करण्याचे आवाहन केले. जदभारतदास महाराज यांनी प्रत्येक परिसरात अशा प्रकारच्या समस्त हिंदू समाजाच्या एकत्रीकरणाची आवश्यकता असल्याचे सर्व धार्मिक संस्था, सामाजिक संघटना यांनी एकत्र येऊन धर्मकार्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. यावेळी नगरसेवक निलेश तरस, बापूसाहेब कातळे, नगरसेविका सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस, राजेंद्र तरस, नगरसेवक धर्मपाल तंतरपाळे, नरेंद्रनाथ महाराज भक्त परिवार, स्वाध्याय परिवार, समर्थ बैठक परिवार, आर्ट ऑफ लिविंग, पतंजली परिवार,बापदेव महाराज ट्रस्ट, जेष्ठ नागरिक संघाचे सभासद उपस्थित होते.
महिला भजनी मंडळे दिंडीद्वारे संमेलनस्थानी पोहोचले.नादवेध संगीत अकादमीच्या शर्मिला शिंदे, निलेश शिंदे यांच्यासह चमूने सादर केलेल्या गीतांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली तर भावना सामंत, पद्मिनी सोनवणे, स्वरेशा पोरे कुलकर्णी यांच्या चमूने बहारदार सादरीकरण केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सांस्कृतिक वार्तापत्राच्या संघ यात्रा या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन कैलास शिंदे तर आभार सुभाष पाटील यांनी मानले.कार्यक्रमाला परिसरातील हिंदू बांधव भगिनी हजारोंच्या संख्येत उपस्थित होते.



हिंदू संमेलनाची क्षणचित्रे
-भजनी मंडळांचे टाळ मृदुंगाच्या गजरात आगमन
-अतिशय शिस्तबद्ध कार्यक्रम
-महिलांचा लक्षणीय सहभाग
-स्थानिक कलावंतांचे विशेष सादरीकरण
-संपूर्ण परिसर भगवामय
-पर्यावरणपूरक व्यवस्था
-हिंदू संमेलनस्थानी युवक – युवती, ज्येष्ठांचा उत्साही सहभाग
-डौलात फडकणारे भगवे ध्वज
-शिस्तबद्ध ओळीत महाप्रसादाचे वितरण
-परिसरातील आध्यात्मिक, सामाजिक संघटनांचा मोठा सहभाग
-कार्यक्रमस्थळी समर्थ हॉस्पिटलचे डॉ.विनोद पटेल व चमू ॲम्ब्युलन्ससह उपस्थित
-सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सहभागी
-महिला ग्रूपचे सामूहिक पसायदान
-कार्यक्रमस्थानी पुस्तक/ ग्रंथ विक्री स्टॉल
-पोलिसांचा चोख बंदोबस्त
पंचपरिवर्तन महारांगोळी
कार्यक्रमस्थानी समाज परिवर्तनासाठी महत्वपूर्ण असलेले पाच बिंदू –
सामाजिक समरसता
कुटुंब प्रबोधन
पर्यावरण संरक्षण
‘ स्व’बोध
नागरी कर्तव्ये
यावर आधारित भव्य महारांगोळीने उपस्थितांचे लक्ष वेधले.
