पुणे दि.४ (सिटीनामा वृत्तसेवा)
सेवेचा अनोखा अनुभव मिळविण्यासाठी, सेवाकार्याची माहिती तसेच विविध खाद्य पदार्थांची चव चाखण्यासाठी सेवासहयोग या संस्थेतर्फे शाश्वत विकासासाठी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवा वर्ष २०२६ निमित्याने सेवाफेस्ट २०२६ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील पु.ल.देशपांडे उद्यानातील कलाग्राम मध्ये दि.१४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ४ ते ८ दरम्यान सेवा फेस्ट २०२६ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सेवासहयोग या सेवाकार्यातील अग्रेसर संस्थेतर्फे देण्यात आली आहे.
काय आहे सेवा फेस्ट ?
सेवा संवाद
विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सेवा प्रवासातील कथा आणि अनुभवाची सांगड घालणारा कार्यक्रम या संवादातून सकारात्मक बदल घडवणाऱ्या यशोगाथा आणि सेवाभाव जागवणारी प्रेरणा मिळेल.
विविध गुणदर्शन
विविध प्रकल्पांमधून सहभागी झालेल्या मुली, मुले आणि महिलांकडून सादर होणारे व्यासपीठ सादरीकरण विशेष आकर्षणाचा भाग असेल
सेवा दर्शन
विविध सेवाकार्यात सहभागी असणाऱ्या कार्यकर्त्यांनी उभारलेल्या प्रकल्प स्टॉल्स ला तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊ शकता, सहभाग घेऊ शकता आणि प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे थेट प्रात्यक्षिक अनुभवू शकता.
वॉल ऑफ फेम
या विभागात सेवा सहयोगच्या प्रकल्पातून घडलेल्या यशोगाथांची मांडणी करण्यात येणार आहे यासोबतच यशस्वी व्यक्तींसोबत संवाद देखील करता येणार आहे.
सेवा फेअर आणि फूड स्टॉल
महिला सक्षमीकरण प्रकल्पाचा दशकपूर्ती सोहळा साजरा करण्यात येणार असून त्यासोबतच या अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी स्वतः तयार केलेल्या विविध वस्तूंची खरेदी तसेच त्यांनी बनविलेल्या चविष्ट पदार्थाचा मनसोक्त आस्वाद घेण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
डोनेशन पॅव्हेलियन
विविध वास्तुरूप देणग्यांद्वारे समाजासाठी योगदान तुम्ही देऊ शकता.येथे जून पण वापरण्यायोग्य लॅपटॉप, मोबाईल, संगणक, गोष्टींची पुस्तके, नवीन वह्या, स्टेशनरी, रद्दी तसेच जुन्या साड्या देखील देऊ शकता.
काय अनुभवता येईल यात?
- स्वयंसेवक (Volunteer) म्हणून सहभागी होण्याच्या विविध संधी
- वॉल ऑफ फेम
- सेवा संवाद
- सेवा फेअर आणि फूड स्टॉल
- सेवा दर्शन व प्रात्यक्षिके
- महिला सक्षमीकरण प्रकल्प दशकपूर्ती सोहळा
- डोनेशन पॅव्हेलियन
असा अनोखा सेवेचा आनंद समजून घेण्यासाठी व प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आपण सहकुटुंब नक्की भेट देण्याचे आवाहन सेवा सहयोग तर्फे करण्यात आले आहे.
