नीट परीक्षा गोंधळ: मुलांच्या भावविश्वावर परिणाम – डॉ.सचिन बोधनी

Share this News

नीट परीक्षा गोंधळ: मान्यवर वाचकांच्या विशेष प्रतिक्रिया –

एक मानसोपचार तज्ञ म्हणून आणि समाजातील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास करणारा व्यक्ती म्हणून मला असं स्पष्टपणे वाटतं की, NEET सारख्या परीक्षांमध्ये होणारा गोंधळ हा केवळ प्रशासकीय प्रश्न नाही, तर तो लाखो विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय आहे.

आजची मुलं वर्षभर अथक मेहनत घेऊन या परीक्षेची तयारी करतात. तयारी करतानाच त्यांच्यावर प्रचंड मानसिक ताण, स्पर्धेचं दडपण, अपयशाची भीती आणि पालकांच्या अपेक्षांचं ओझं असतं. परीक्षा केंद्रावर बसताना देखील विद्यार्थी भीती, तणाव आणि अस्वस्थतेचा सामना करत असतात. परीक्षा संपल्यानंतर अनेक मुलं त्या तणावातून बाहेर पडलेली असतात आणि आशेने निकालाची वाट पाहत असतात.

मात्र अचानक परीक्षा रद्द झाल्याची बातमी समोर येते आणि एका क्षणात या विद्यार्थ्यांचं मानसिक संतुलन हादरून जातं. आपण सहजपणे “परीक्षा रद्द झाली” असं बोलून जातो, पण प्रत्यक्षात हा लाखो विद्यार्थ्यांच्या भावविश्वावर झालेला मोठा आघात असतो. अनेक विद्यार्थी नैराश्यात जातात, भयभीत होतात, त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. पुन्हा नव्याने तयारी करून त्याच तणावाला सामोरं जाणं हे अत्यंत वेदनादायक आणि भयावह असतं.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या मुलांच्या मानसिक स्थितीचा विचार कुठेच गंभीरपणे केला जात नाही. National Testing Agency सारख्या संस्थांनी अशा प्रकारचा अन्याय विद्यार्थ्यांवर होऊ देता कामा नये. विद्यार्थ्यांचं एक वर्ष वाया जाणार नाही याची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी घ्यायला हवी.

तसंच, पेपरफुटी करणाऱ्यांकडे केवळ “गुन्हेगार” म्हणून न पाहता त्यांनी लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ केला आहे, या दृष्टीने पाहणं आवश्यक आहे. अशा गुन्ह्यांवर कठोरातील कठोर शिक्षा झाली तरच भविष्यात अशा घटना थांबू शकतील. अन्यथा विद्यार्थ्यांचं मानसिक, शैक्षणिक आणि सामाजिक नुकसान अशाच प्रकारे होत राहील.

— डॉ. सचिन बोधनी
मानसोपचार तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *