पिंपरी / पुणे दि.७ मे (सिटीनामा वृत्तसेवा)
नसरापूर व म्हाळुंगे येथे चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पिंपरी चिंचवड महानगर यांच्या वतीने शहरात भव्य ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. पीडितांना त्वरित न्याय मिळावा तसेच दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
मोर्चाची सुरुवात डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथून होऊन महेश नगर चौक, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज मार्गे वायसीएम चौक (पंचशील बुद्ध विहार) येथे समारोप करण्यात आला. मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.
अभाविपच्या वतीने बलात्कार प्रकरणांमध्ये कठोर कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली. “समाजात लहान मुलीही सुरक्षित नाहीत, ही गंभीर बाब असून सरकारने आरोपींवर कठोर कारवाई करावी” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
यावेळी प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी, महानगर मंत्री हिमांशू नागरे, पिंपरी नगर मंत्री वैष्णवी बुधवंत, मानस आमोडकर, राज गावडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

