पुणे दि.१ फेब्रुवारी (सिटीनामा वृत्तसेवा) बऱ्याच दिवसांपासून सुरू होण्याच्या प्रतिक्षेत असलेला हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कॉरिडॉर मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कार्यान्वित होण्याची माहिती मिळाली असून यामुळे पुणेकरांचा महत्वाचा वेळ वाचणार आहे. पुणे शहरातील प्रमुख आयटी हब असलेल्या हिंजवडीमधील दैनंदिन वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या या मेट्रो प्रकल्पाच्या दोन महत्त्वाच्या चाचणी फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आहेत असे मेट्रो अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हा मार्ग कार्यान्वित झाल्यावर, ही मेट्रो हिंजवडी आणि पुणे शहर यांच्यातील प्रवासाचा वेळ लक्षणीय कमी होणार आहे. तब्बल दोन तासांचा प्रवास अवघ्या ३० मिनिटांवर येईल. आयटी कर्मचारी आणि कंपन्यांसाठी दिलासा हिंजवडीच्या राजीव गांधी आयटी पार्कमध्ये ८०० पेक्षा अधिक कंपन्या आहेत आणि सुमारे २.२ लाख व्यावसायिक या भागात काम करतात. या मेट्रो मार्गामुळे या भागातील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन प्रवासाला मोठा दिलासा मिळण्याची आणि त्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात प्रवासात होत असलेला त्रास देखील कमी होणार आहे.२३.२० किलोमीटर लांबीच्या सदर कॉरिडॉरवर २३ स्थानके असतील आणि तो १४ ट्रेनसेटसह चालवला जाणार आहे. तांत्रिक तपासणी आणि सुरक्षा तपासणी पूर्ण झाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची जागेवर जाऊन पाहणी केल्याची माहिती आहे. या मेट्रो मार्गामुळे आयटी अभियंते, कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
