देहू दि.२६ जानेवारी (सिटीनामा वृत्तसेवा) वै. ह.भ.प.शिरीष महाराज मोरे हे हिंदुत्वाची ज्वलंत प्रेरणा, छत्रपती शिवाजी महाराज,धर्मवीर संभाजी महाराज यांच्या कार्याचे अभ्यासू, तर्कशुद्ध मांडणी करणारे व्याख्याते होते ज्यांच्यामुळे आज महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांना हिंदुत्वाचे, शिवशंभु विचारांच्या कार्यासाठी बळ मिळाले असे नेतृत्व होते असे प्रतिपादन शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष , वारकरी संप्रदाय युवा मंचाचे अध्यक्ष ह.भ.प.श्री.अक्षय महाराज भोसले यांनी आपल्या कीर्तनात केले. ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज, ओजस्वी शिवव्याख्याते वैकुंठवासी ह.भ.प.शिरीष महाराज मोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त झालेल्या कीर्तनसेवेत बोलत होते.
वै. शिरीष महाराज हे बालपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तीने भारलेले होते, संघाच्या शाखेत या भक्तीला शिवचरित्राच्या अभ्यासाने बळ दिले. जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा लाभलेला वारसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा प्रचंड अभ्यास यामुळे अगदी कमी वयात शिरीष महाराजांनी भक्ती शक्तीचा वारसा संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या ओजस्वी वाणीने पोहोचवला परंतु हे करत असताना केवळ स्वतःच्या प्रसिद्धीचा विचार न करता आपल्या ओळखीतल्या प्रत्येक तरुण मित्राला या कार्यासाठी प्रेरणा दिली . शिवशंभू चरित्राचा अभ्यास करण्याची त्याकरिता हवी ती मदत करण्यासाठी महाराज सतत प्रयत्न करत असत याच प्रयत्नातून आज महाराष्ट्रभर शिवशंभू विचार मंचाच्या माध्यमातून अनेक तरुण छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या चरित्राचा अभ्यास व मांडणी करीत आहेत. तथाकथित पुरोगाम्यांनी इतिहासाची मोडकी मांडणी करून अपप्रचार केला. वै.शिरीष महाराजांनी अभ्यासपूर्ण व खरी मांडणी करून महत्वपूर्ण कार्य केले. विशेषत: तरुण मंडळी शिरीष महाराजांच्या प्रेरणेने मोठं कार्य करीत आहे त्यापैकीच मी एक आहे याचा मला अभिमान असल्याचे भोसले महाराज म्हणाले. हे परिस कार्य करत असताना मात्र शिरीष महाराजांनी कधीच स्वतःच्या परिवाराचा, आर्थिक परिस्थितीचा विचार केला नाही आज कीर्तन हा चांगल्या उत्पन्नाचा एक व्यवसाय झाला आहे, शिरीष महाराज सुद्धा एक सामान्य कीर्तनकार नव्हे तर प्रत्यक्ष जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज होते त्यांना हवे तेवढे धन या माध्यमातून कमावता आले असते मात्र शिरीष महाराजांनी केलेल्या एकाही कीर्तनाचे पैसे स्वतः न घेता धर्मकार्य करता दान केले म्हणूनच त्यांना चंदनाची उपमा सुद्धा देता येऊ शकते स्वतः झिजले मात्र स्वतःच्या दुःखाची, अडचणीची साधी भनकही समाजाला लागू दिली नाही व या जगाचा निरोप घेतला. असे असले तरी आम्ही सर्व शिरीष महाराजांच्या परिवाराच्या आणि कार्याच्या कायम पाठीशी राहून त्यांचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करीत राहू असे प्रतिपादन अक्षय महाराज यांनी केले यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देखील वै.शिरीष महाराजांच्या कुटुंबीयांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन केले.
याप्रसंगी जगद्गुरु संत श्री. तुकाराम महाराज संस्थानचे माजी विश्वस्त ह.भ.प. माणिक महाराज मोरे, विश्व हिंदू परिषदेचे दादा वेदक यांनी शिरीष महाराजांच्या स्मृतीस अभिवादन करून आदरांजली अर्पण केली.
वै.शिरीष महाराजांना आदरांजली अर्पण करण्यासाठी देहू परिसरातील अनेक मान्यवर मंडळी, शिव शंभू विचारमंचाचे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक कार्यकर्ते, संघ परिवार, देहू पंचक्रोशीसह राज्यभरातील अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी वै.शिरीष महाराजांच्या आठवणीने उपस्थित सर्वजण भावूक झाले होते.
