-अभाविप आळंदी नगराचा स्तुत्य उपक्रम आळंदी दि.१ फेब्रुवारी (सिटीनामा वृत्तसेवा)
श्रीक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीचा परिसर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आळंदी नगर शाखेच्या वतीने ‘संडे फॉर इंद्रायणी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रविवार दि.१ फेब्रुवारी सकाळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी इंद्रायणी घाटावर एकत्र येत स्वच्छता मोहीम राबवली.
इंद्रायणी नदी ही लाखो वारकरी भाविकांचे श्रद्धास्थान आहे, मात्र घाटावर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि कचरा साचत असल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळते. ही बाब लक्षात घेऊन अभाविप आळंदी नगराने दर रविवारी स्वच्छता करण्याचा संकल्प केला आहे. आजच्या मोहिमेत कार्यकर्त्यांनी नदीपात्रातील प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, निर्माल्य आणि इतर कचरा गोळा करून घाटाची स्वच्छता केली.
विशेष म्हणजे, मागील अनेक आठवड्यांपासून अभाविपचे कार्यकर्ते कोणताही खंड पडू न देता हे अभियान राबवत आहेत. “केवळ प्रशासनावर विसंबून न राहता, नदीचे पावित्र्य राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे,” अशी भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. गोळा केलेला कचरा योग्य विल्हेवाटीसाठी नगरपरिषद प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत अभाविप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अभाविपच्या या सातत्यपूर्ण कार्याचे आळंदीतील नागरिकांकडून आणि वारकरी भाविकांकडून विशेष कौतुक होत आहे.

