शनिवारी पुण्यात ‘नारी तू नारायणी’

Share this News

पुणे दि.१८ (सिटीनामा वृत्तसेवा)
स्वावलंबन आणि महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तनात्मक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने, पुण्यात शनिवार, २१ फेब्रुवारीला ‘नारी तू नारायणी’ या विशेष पूर्व परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्र सेविका समिती आणि ज्ञानभारती यांच्या वतीने आयोजित ही परिषद कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या के. बी. जोशी सभागृहात सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती राष्ट्र सेविका समितीच्या प्रांत कार्यवाहिका शैलजा देशपांडे यांनी दिली.
दिल्ली येथे येत्या ७ आणि ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर या पुणे विभागीय पूर्व परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ या प्रवासात महिलांचा सहभाग वाढविणे आणि त्यांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात जोडणे हे या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या परिषदेत एकूण तीन सत्रे होणार आहेत. ‘नारी तू नारायणी’ या विषयावर डेक्कन कॉलेजच्या डॉ. प्रज्ञा कुलकर्णी यांचे बीजभाषण होईल. ‘कृती ते कर्तृत्व’ या सत्रात दोन महिला संशोधकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. यामध्ये ‘फ्लड फोरकास्ट मॉडेल’वर काम करणाऱ्या डॉ. प्रज्ञा दीक्षित (व्हीआयटी, पुणे) आणि ‘पोर्टेबल बायो-टॉयलेट’च्या संशोधक डॉ. आरती शास्त्री यांचा सहभाग असेल.
समारोप सत्रात ज्ञान प्रबोधिनीच्या संचालक डॉ. अनघा लवळेकर ‘नारी ते नारायणी प्रवासात सेवाकार्याचे महत्त्व’ या विषयावर विचार मांडतील.
महिला विचारवंतांना त्यांचे विचार मांडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या परिवर्तनात्मक क्षमतेचा राष्ट्राच्या भविष्यासाठी उपयोग करणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले आहे. जिजामाता स्मारक समिती व बाया कर्वे स्त्री अभ्यास व संशोधन केंद्राचा सहयोग या परिषदेस लाभला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *