पिंपरी-चिंचवड दि.२२ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)
पुणे-मुंबई महामार्गावर विजय सेल्स व जय हिंद परिसरातून एम्पायर इस्टेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक नियमांचा खुलेआम भंग होत असून, या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या मार्गावर स्पष्टपणे ‘नो पार्किंग’चे फलक असतानाही रिक्षा, कार तसेच मोठी वाहने रस्त्यावरच बेकायदेशीरपणे उभी केली जातात. अनेक वेळा रिक्षा व इतर वाहने चुकीच्या दिशेने (Wrong Side) येताना दिसतात. इतकेच नव्हे तर मोठ्या मालवाहू वाहनांकडूनही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे आधीच वर्दळीच्या असलेल्या या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनचालक तसेच पादचाऱ्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.
विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर वाहने चुकीच्या पद्धतीने उभी असताना आणि काही वाहने विरुद्ध दिशेने येत असताना परिस्थिती अत्यंत धोकादायक बनते. एखाद्या वाहनचालकाने अचानक चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनास चुकवण्याचा प्रयत्न केला, तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
“वाहतूक पोलीस एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर या समस्येकडे लक्ष देणार आहेत का? की दुर्घटना घडण्यापूर्वीच या गंभीर समस्येवर कारवाई केली जाणार आहे?” असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या मार्गावर नियमितपणे वाहतूक पोलिसांची गस्त वाढवावी, नो-पार्किंग क्षेत्रात उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही व इतर वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने या ठिकाणी लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. सचिन बोधनी यांनी केली आहे.
(छायाचित्र – विरुद्ध दिशेने येणारे ऑटो छायाचित्रात दिसत असून, चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.)
