नऱ्हे / पुणे दि.२१ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)
भारतीय मजदूर संघ, पुणे जिल्ह्याच्या वतीने सिंहगड इन्स्टिट्यूट, नऱ्हे कॅम्पस, पुणे येथे दि.२० जुलै २०२६ रोजी भारतीय मजदूर संघाच्या वार्ताफलकाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

यापूर्वी भारतीय मजदूर संघाच्या वतीने सिंहगड इन्स्टिट्यूट, कोंढवा कॅम्पस येथे वार्ताफलकाचे उद्घाटन करून संघटन कार्याची यशस्वी सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर आता नऱ्हे कॅम्पसमध्येही कर्मचारी मोठ्या उत्साहाने भारतीय मजदूर संघाचे सभासद होत असून, संघटनेवरील त्यांचा वाढता विश्वास ही आनंदाची बाब असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
या उद्घाटन समारंभाला भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचे संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ, प्रदेशाचे उपाध्यक्ष सचिन मेंगाळे, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण, जिल्ह्याचे संघटन मंत्री उमेश विश्वाद, तसेच सिंहगड इन्स्टिट्यूटमधील मोठ्या संख्येने कर्मचारी व सभासद उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी कर्मचारी संघटन, कामगार हक्क, सामाजिक सुरक्षा, न्याय्य वेतन, सुरक्षित कामाचे वातावरण आणि कर्मचारी हितासाठी संघटित होण्याचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. भारतीय मजदूर संघ हा केवळ मागण्यांसाठी लढणारा नव्हे, तर राष्ट्रहित, उद्योगहित आणि कामगारहित या त्रिसूत्रीवर कार्य करणारा देशातील सर्वात मोठा कामगार संघ आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नऱ्हे कॅम्पसमध्ये वार्ताफलकाची स्थापना झाल्यामुळे संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती, कामगार कायदे, शासनाच्या योजना, संघटनेचे निर्णय, सूचना व कामगार हिताच्या घडामोडी कर्मचारी वर्गापर्यंत नियमितपणे पोहोचतील. त्यामुळे कर्मचारी आणि संघटना यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होण्यास मदत होईल.
यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी भारतीय मजदूर संघावर पूर्ण विश्वास व्यक्त करत संघटन अधिक मजबूत करण्याचा संकल्प केला. कोणत्याही कर्मचारीवर अन्याय झाल्यास भारतीय मजदूर संघ त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमामुळे सिंहगड इन्स्टिट्यूटमधील संघटन कार्याला नवीन बळ मिळाले असून, आगामी काळात अधिकाधिक कर्मचारी भारतीय मजदूर संघाशी जोडले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
