चिंचवड दि.२१ (सिटीनामा वृत्तसेवा)
स्व. ज्ञानेश्वर देवकुळे यांच्या १५ व्या स्मृतिदिनानिमित्त स्व. ज्ञानेश्वर देवकुळे सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने चिंचवड येथील “पुनरुत्थान समरसता गुरुकुलम” येथे वास्तव्यास असलेल्या मुलांसाठी अन्नदान उपक्रम राबविण्यात आला.
समाजातील वंचित व गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचावा, या उद्देशाने फाउंडेशनकडून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी गुरुकुलममधील मुलांना प्रेमपूर्वक अन्न वाटप करण्यात आले. स्व. ज्ञानेश्वर देवकुळे यांनी आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपत सेवाभावाचे कार्य केले. त्यांच्याच विचारांना अभिवादन म्हणून हा उपक्रम राबविण्यात आला, असे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.
या कार्यक्रमास गुरुकुलमचे संस्थापक पद्मश्री गिरीशजी प्रभुणे, फौंडेशनचे अध्यक्ष प्रा डॉ हेमंत देवकुळे,तुषार देवकुळे, राहुल बल्लाळ, अमर नांगरे तसेच फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, गुरुकुलमचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थितांनी स्व. ज्ञानेश्वर देवकुळे यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण करत, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्याचा संकल्प व्यक्त केला.

