भक्तिरसात न्हाऊन निघाले चिखली प्राधिकरणातील घरकुलवासी…!!

Share this News

-घरकुलवासी व शिव पार्वती भजनी मंडळातर्फे अखंड हरीनाम सप्ताह भक्तिभावात
चिखली (पुणे) दि.२१ (सिटीनामा वृत्तसेवा)
येथील समस्त घरकुलवासी व शिव–पार्वती भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड हरीनाम सप्ताह अत्यंत भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहात ११ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत यशस्वीरीत्या संपन्न झाला.
गेली तब्बल ११ वर्षे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते हे विशेष. या हरीनाम सप्ताहात घरकुलवासी भक्तिरसात न्हाऊन निघाले.
या सप्ताहात गोकुळधाम, वृंदावन येथील साध्वी देवी वैभवीश्रीजी दीदी यांच्या अमोघ, ओजस्वी व हृदयस्पर्शी, सुश्राव्य वाणीतून दररोज सायंकाळी संतचरित्र कथन व भागवत कथामृताच्या माध्यमातून श्रोत्यांना भक्ती, वैराग्य, सदाचार व संस्कार यांचे मोल अतिशय प्रभावीपणे उमगले.
या सप्ताहात संत परंपरेचा वैभवशाली वारसा उलगडत संत भानुदासजी, संत मीराबाईजी, संत नामदेवजी, संत सूरदासजी, संत मुक्ताबाई, संत कबीरजी, संत गुलाबराव महाराज व संत तुकारामजी
यांचे जीवनचरित्र, अभंग, विचारधारा व समाजप्रबोधनपर कार्य श्रोत्यांसमोर उलगडण्यात आले.
सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकड आरती, सामूहिक हरिपाठ, ग्रंथ पारायण, महिला व पुरुष वारकरी भजन मंडळांचे सुमधुर भजन, हरिनाम संकीर्तन तसेच महाप्रसाद असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
‘राम कृष्ण हरि’ ‘ ज्ञानोबा तुकाराम’ व ‘ॐ नमः शिवाय’*च्या अखंड गजराने हरिहर मंदिर, श्रीराम चौक व संपूर्ण घरकुल वसाहत परिसर अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाला.
सप्ताहातील एक विशेष आकर्षण म्हणजे राधा–कृष्ण विवाह सोहळा, ज्यामध्ये भाविकांनी सुंदर वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला. या देखण्या सादरीकरणामुळे परिसरात जणू वृंदावनाची अनुभूती निर्माण झाली. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी संत तुकाराम महाराज चरित्र कथनाच्या निमित्ताने संत तुकाराम महाराज व त्यांचे चौदा वारकरी वेशभूषेत भाविक सहभागी झाले होते. या सजीव देखाव्यामुळे संतपरंपरेचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहून उपस्थित भाविक भावविवश झाले.या सर्व कार्यक्रमांना घरकुल वसाहतीतील भाविकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला. परिसरातील सन्माननीय लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या सप्ताह सोहळ्याला उपस्थिती लावली.
घरकुलवासी युवक–युवती, महिला मंडळ व ज्येष्ठ नागरिकांनी स्वयंसेवक म्हणून घेतलेल्या अथक परिश्रमांमुळे हा अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत शिस्तबद्ध व यशस्वीपणे पार पडला. समारोपप्रसंगी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
भक्ती, संस्कार, सामाजिक ऐक्य व वारकरी परंपरेचे जतन करणारा हा अखंड हरिनाम सप्ताह भाविकांच्या मनात कायमस्वरूपी स्मरणात राहील अशा भावना भाविकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *