-वैयक्तिक व गट कर्ज योजना
पुणे दि.२७ (सिटीनामा वृत्तसेवा)
परशुराम आर्थिक विकास महामंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या वैयक्तिक कर्ज योजना व गट कर्ज योजनेची अंमलबजावणी औपचारिकरित्या सुरू करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन साधण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांना भांडवली मदत उपलब्ध करून देणे हा या योजनांचा मुख्य उद्देश असून राज्यातील पात्र घटकांसाठी ही महत्त्वपूर्ण संधी ठरणार आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज वितरण प्रक्रियेलाही प्रारंभ करण्यात आला आहे. यानिमित्ताने महामंडळाच्या पुणे येथील कार्यालयात पहिल्या अर्जदार म्हणून अमेय असलेकर यांना महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले व व्यवस्थापकीय संचालक तुषार ठोंबरे यांच्या उपस्थितीत अर्ज तसेच योजनांचे माहितीपत्रक प्रदान करण्यात आले.
महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक व गट कर्ज योजनांमुळे स्वयंरोजगार, लघुउद्योग व उत्पन्नवाढीच्या संधी निर्माण होण्यास चालना मिळणार असून समाजातील अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष आशिष दामले यांनी केले.
सदर योजनांसाठीचे अर्ज महामंडळाच्या संबंधित कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले असून ते परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी https://pavm.maharashtra.gov.in/योजना/ या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज डाउनलोड करावेत किंवा जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज सादर करावेत, असे महामंडळामार्फत कळविण्यात आले आहे.
