संत रोहिदास महाराज स्वातंत्र्य, समता व श्रमप्रतिष्ठेचे दीपस्तंभ – किरकोळे

Share this News

पुणे दि.२८ जुलै (सिटीनामा वृत्तसेवा)

“संतश्रेष्ठ रोहिदास महाराजांनी तत्कालीन विषम सामाजिक व्यवस्थेतील वेदनांना निराशेचे रूप न देता त्या आपल्या वाणीचे, विचारांचे आणि भक्तीचे सामर्थ्य बनविले. त्यांच्या शब्दांतून केवळ एका संताचे जीवन व्यक्त होत नाही, तर शोषित, वंचित आणि श्रमजीवी समाजाच्या वेदनांना आवाज मिळतो. त्यांनी श्रमाला ईश्वरपूजेचे स्थान दिले आणि ‘कष्ट हेच खरे वैभव’ हा जीवनमंत्र जगासमोर ठेवला. त्यामुळे संत रोहिदास महाराज हे श्रमप्रतिष्ठेचे चिरंतन प्रतीक ठरले,” असे प्रभावी प्रतिपादन अखिल भारतीय समरसता गतिविधीचे सहसंयोजक रवींद्र किरकोळे यांनी केले.श्री महागणेश अधिष्ठान विश्वस्त न्यास, पुणे (महाराष्ट्र) यांच्या वतीने संत शिरोमणी सद्गुरू श्री रोहिदास महाराज यांच्या ६५० व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित कीर्तन–प्रवचन–व्याख्यान महोत्सव आणि ‘६५१ पुष्प समर्पण अभियान’ संकल्प समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश हॉलमध्ये हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.रवींद्र किरकोळे पुढे म्हणाले, “संत रोहिदास महाराजांच्या दृष्टीने माणसाचे मोठेपण जन्मावर किंवा जातिव्यवस्थेवर नव्हे, तर कर्म, चारित्र्य आणि अंतःकरणाच्या निर्मळतेवर अवलंबून होते. धार्मिक व आध्यात्मिक अधिकार हा बाह्य कर्मकांडात नसून अंतःकरणाच्या शुद्धतेत असतो, हे त्यांनी आपल्या आचरणातून सिद्ध केले. त्यांनी भक्तीला समता, मानवता आणि आत्मसन्मानाची दिशा दिली. त्यामुळे त्यांचे जीवन सामाजिक परिवर्तन आणि आध्यात्मिक क्रांतीचे तेजस्वी उदाहरण ठरते.”त्यांनी संत रोहिदास महाराजांच्या स्वातंत्र्यवादी विचारांवरही प्रकाश टाकत सांगितले की, “त्या काळातील पारतंत्र्य, सामाजिक गुलामी आणि अन्यायाविरुद्ध स्वातंत्र्याचा पहिला निर्भय स्वर संत रोहिदासांच्या वाणीतून उमटतो. पराधीन जीवन हे मानवी प्रतिष्ठेला कलंक आहे, अशी त्यांची ठाम भूमिका होती. ‘जो पारतंत्र्यात राहतो, तो उपवासालाच पात्र ठरतो’ या विचारातून त्यांनी स्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि मानवी प्रतिष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले.”संत रोहिदासांचे साहित्य लोकभाषेत आणि बोलीभाषेत असल्यामुळे ते थेट जनमानसाशी संवाद साधते, असे सांगत त्यांनी त्यांच्या प्रत्येक दोह्यातून समता, श्रमाचा गौरव, भक्तीची निर्मळता आणि सामाजिक न्यायाचा संदेश प्रकट होत असल्याचे नमूद केले. “संत रोहिदास महाराज आजही केवळ एका समाजाचे नव्हे, तर संपूर्ण मानवजातीच्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या विचारांचे चिरंतन दीपस्तंभ आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाची सुरुवात ह.भ.प. मोरेश्वर जोशी यांच्या संत रोहिदास महाराजांवरील भावस्पर्शी कीर्तनाने झाली. समरसता गतिविधीचे महाराष्ट्र-गोवा क्षेत्र सदस्य निलेश गद्रे यांनी प्रास्ताविक केले, तर अॅड. आनंद गवळी यांनी संत रोहिदासांच्या विचारांचे समकालीन संदर्भांसह विशेष मार्गदर्शन केले.  व्यासपीठावर अड. आनंद गवळी, ह.भ.प. मोरेश्वर जोशी आणि मुकुंद आफळे उपस्थित होते.  यावेळी  विलास लांडगे, रवी ननावरे ,गीतेश जोशी, डॉ. प्रसाद खंडागळे, आबा देशपांडे, अनिल भस्मे,गोरख शिंदे, दत्ता वाळवेकर,राजेश मठपती, शरद शिंदे अॅड. मुकुंद यदमळ, डॉ. माणिक सोनावणे, धनंजय खुडे, शुभांगी पोटभरे प्रमोद पोटभरे स्मिता देशपांडे विलास देशपांडे,विकास माने, सुरेश महाले, प्रतिभा कुलकर्णी ,अॅड एकनाथ जाविर, यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.महोत्सवानिमित्त संत रोहिदास महाराजांवरील माहितीपूर्ण पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कार्यकारी मंडळ, कीर्तनकार आणि चरणसेवकांचा सन्मान करण्यात आले. मान्यवरांनी संत रोहिदास महाराजांच्या जयंती वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनपर उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन डॉ. धनंजय भिसे यांनी केले, तर आभार मुकुंद आफळे यांनी मानले.

“संतश्रेष्ठ रोहिदास महाराजांनी भारतीय समाजाला समता, मानवता आणि निर्मळ भक्तीचा कालातीत संदेश दिला. त्यांनी स्त्रीचा सन्मान हा समाजाच्या नैतिकतेचा पाया मानला. मोगलांच्या काळात धर्मांतराच्या प्रवृत्तीला त्यांनी निर्भीडपणे विरोध करत स्वधर्म, स्वाभिमान आणि अध्यात्मिक मूल्यांचे रक्षण केले.
त्यांच्या विचारांना समाजातील सर्व स्तरांतून स्वीकार मिळाल्याने त्यांची शिष्यपरंपरा हिंदू धर्मातील विविध जाती-जमातींमध्ये विस्तारली. त्यांच्या वाणीतील सार्वत्रिक मानवतावादामुळेच त्यांच्या पवित्र रचनांना शीख धर्माच्या पवित्र ‘गुरु ग्रंथ साहिब’मध्ये मानाचे स्थान प्राप्त झाले.
संत रोहिदासांनी कर्मकांड, जातिभेद आणि बाह्य आडंबर यांना विरोध करून अंतःकरणातील शुद्धता, प्रामाणिक श्रम आणि निर्मळ भक्ती यांनाच खऱ्या अध्यात्माचे अधिष्ठान मानले. त्यांच्या वाङ्मयातून स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठा या मूल्यांचे बीजारोपण झाले. त्यामुळे संत रोहिदास महाराज हे केवळ संतकवी नव्हते, तर सामाजिक समरसता आणि मानवमुक्तीचे महान प्रणेते होते.”
-निलेश गद्रे
सदस्य ,समरसता मंच ,महाराष्ट्र व गोवा

भारतभरात संत रोहिदास महाराज यांच्या जीवन व कार्यावर कीर्तन, प्रवचन, व्याख्यानांच्या माध्यमातून ६५१ कार्यक्रमाचा संकल्प करण्यात आला.या संकल्प समारंभातून संत रोहिदास महाराजांचा समता, श्रमप्रतिष्ठा, बंधुता, स्वातंत्र्य आणि मानवतेचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा दृढ निर्धार व्यक्त करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *